गोंदिया : बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जाताे. या गावांवर पाणीपट्टीचे एक कोटी ६८ लाख ७ हजार ८३ रुपये थकीत आहेत. यामुळे या ३६ गावांचा पाणीपुरवठा बुधवारपासून (दि.२३) ठप्प करण्यात आला आहे. परिणामी भर पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याची वेळ या ३६ गावातील नागरिकांवर आली आहे.
कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापीटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही. परिणामी ३६ गावांवर एक कोटी ६८ लाख ७ हजार ८३ रुपये थकीत आहेत. यात आमगाव तालुक्यातील २५ गावांवर एक कोटी १० लाख ७९ हजार ४११ रुपये थकले तर सालेकसा तालुक्यातील ४ गावांवर १७ लाख ५३ हजार ३६० रुपये थकले आहेत.
आमगाव नगरपरिषदेने भरले ४० लाख रुपये
आमगाव नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ८ गावांपैकी ७ गावे या योजनेचे पाणी वापरत आहेत. यात या ७ गावांवर ३९ लाख ७४ हजार १२ रुपये थकीत होते. त्यातील ३९ लाख ७४ हजार १२ रुपये असे संपूर्ण पैसे आमगाव नगर परिषदेने भरले असून पाणीपुरवठा बंद करू नये असेही नगर परिषदेने म्हटल्यावर आमगाव नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
वेळेवर बिलच देत नसल्याने होत नाही वसुली
पाणी पुरवठ्याचे बिल वेळेवर नगर परिषदेला व ग्रामपंचायतींना देत नसल्यामुळे थकीत पैसे ग्रामपंचायत भरत नाही. नगर परिषदेला बिलच पोहोचत नसल्यामुळे पैसे किती आणि केव्हा भरायचे हे कर्मचाऱ्यांना समजत नाही त्यामुळे ही योजना राबविणाऱ्या योजनेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
योजना बंद झाल्याचीच माहिती अधिकारी देतात
योजनाचे थकीत बिल भरण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी ह्या योजनेचे पाणी वापरणाऱ्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना बनगाव पाणीपुरवठा या व्हॉट्सॲप ग्रुपवर जोडून त्यांच्यात सतत जनजागृती करणे अपेक्षित आहे. परंतु योजनेच्या बिलाची थकीत आकडेवारी पुढे येत नाही. योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला की माहिती देण्यात येते.