गोंदिया : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही, असे नियोजन करून पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणाहून पाणी उपलब्ध करून पाणी टंचाईवर मात करावी, तसेच दरवर्षी पाणीपुरवठ्याशी संबंधीत कामे मार्च महिन्यापूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन करीत जा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणीपुरवठ्याबाबत राज्यमंत्री बनसोडे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, पांदन रस्त्यांच्या कामासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी उपलब्ध करून देणार, त्यासाठी मागणी प्रस्ताव सादर करावा. जल जीवन मिशनबाबत वेळोवेळी बैठका घेण्यात याव्या, असे सांगितले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, शहराच्या पाणी टंचाईसाठी डांगोर्ली बॅरेज बांधणे गरजेचे आहे. लोकांना पाणी मिळाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया शहराला सकाळ व संध्याकाळ किती पाणीपुरवठा करण्यात येतो, याबाबत विचारणा करून नाराजी व्यक्त केली. पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सन २०२०-२१ अंतर्गत पाणी टंचाई आराखडा टप्पा १ निरंक असून, टप्पा २ अंतर्गत एकूण १०१ उपाययोजनांचे ५६ लाख ६४ रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झालेली आहे. टप्पा ३ अंतर्गत एकूण १,६४७ उपाययोजनांचे ५८९.१९ लक्ष रुपये आराखड्याला मंजुरी प्राप्त झालेली असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सचिन गोसावी, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेशश भांडारकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सतीश चंद्रसुशिल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे उपस्थित होते.
.....
जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुुरू
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये घरगुती नळ जोडणी एकूण ५४५ ग्रामपंचायतीमध्ये ८८९ व १,६०० वाड्यामधील एकूण कुटुंब संख्या २,५१,८६७ पैकी सन २०२०-२१ अंतर्गत नळ जोडणी व खासगी स्रोत मिळून १,६१,४९८ उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.