राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामीण भागात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाईची समस्या कायम आहे. पिपरी, राका, खोबा, खडकी, मोगरा, राजगुडा, पळसगाव, दोडके, सडक अर्जुनी, डुंडा, खजरी, आपकारीटोला, परसोडी, कुंभारटोली, मुंढरीटोला, माताटोली, कनेरी/राम, हत्तीमारेटोला, केसलवाडा, सितेपार, मालीजुंगा, डोंगरगाव/डेपो, सालेधारणी, पुतळी, राकाटोली, चिंगी, गिरोला या गावातील विहिरी आणि बोअरवेलनी तळ गाठला आहे. परिणामी गावकऱ्यांना दोन ते कि.मी.अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. तर पाणी आणण्यासाठी गावातील महिलांची भल्या पहाटेपासून लगबग सुरू होत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. गावातील पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय योजना करण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत पंचायत समितीला अहवाल सुध्दा पाठविण्यात आला.मात्र पंचायत समितीने दोन दिवसांपूर्वी जि.प.कडे बोअरवेल दुरूस्तीसाठी साहित्याची मागणी केल्याची माहिती आहे. त्यावरुन पाणी टंचाईच्या समस्येवर प्रशासन किती गंभीर आहे हे दिसून येते. पंचायत समितीने तालुक्याचे पिण्याचे पाण्याचे नियोजन फेब्रुवारी महिन्यातच करायला पाहिजे होते. पण ते न केल्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.बंधाऱ्यांनी गाठला तळशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यातील बांधण्यात आलेल्या बंधाºयात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. तालुक्यात सिंचनासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र पाण्याचे पुनर्भरण करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सडक अर्जुनी तालुक्यात पाणी समस्या पेटली आहे. १५ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुतळी ही १६ गावे व २० वाड्यांना पाणी देणारी योजना अधिकाऱ्यांच्या नियोजनाचे अभावामुळे आज बंद पडली आहे.साडेआठशे बोअरवेल आणिसाडेचारशे विहिरीसडक अर्जुनी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७ हजार ८९३ आहे. तर एकूण १०८ गावे आहेत.त्यापैकी ८ रिठी गावे तर १०० महसूली गावे आहेत. त्यात ४२ स्वतंत्र ग्रामपंचायत तर २१ गट ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ८५७ विंधन विहिरीची सोय आहे. शासकीय विहिरी ४५३ आहेत. या शासकीय विहिरी जवळ जवळ कोरड्याच पडल्या आहेत. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे विहिरींना पाणीच नाही. गावाशेजारी रबी धान पिके घेतले जात असल्याने त्याचा सुध्दा भूजल पातळीवर परिणाम झाल्याचे बोलल्या जाते. भुसारीटोला येथे गावकऱ्यांच्या सहकार्याने व ग्रामपंचायतीच्या नियोजनामुळे गाव शेजारी उन्हाळी धान न लावण्याचा संकल्प केल्याने गावात सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या नसल्याची माहिती ग्रामसेवकाने दिली.
सडक अर्जुनी तालुक्यात पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 9:13 PM
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद : बंधाऱ्यातही पाणी नाही