तिरोडा : यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे लावलेले खरीप धान पीक धोक्यात येऊ नये याकरिता धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रमांक-१ चे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्याच्या कामाला आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली, तसेच खैरबंधा जलाशय पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत दोन्ही पंपाद्वारे पाणी सुरू राहणार असल्याचे आमदार रहांगडाले यांनी सांगितले.
मागील ऑगस्ट महिन्यात काही लोकांनी श्रेय घेण्याकरिता पंपाची तांत्रिक स्थिती जाणून न घेता पाणी सोडल्याची बातमी नागरिकांना दिली होती; परंतु त्या काळात १ पंप नादुरुस्त असल्यामुळे पाणी खैरबंधा जलाशयात जाऊ शकले नाही. याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार रहांगडाले यांना देताच त्यांनी उपसा सिंचन विभागाला तत्काळ पंप दुरुस्त करण्याबाबत आदेशित केले. आजघडीला दोन्ही पंप दुरुस्त झाल्याने दोन्ही पंपाद्वारे खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात आले व जोपर्यंत खैरबंधा जलाशय पूर्ण क्षमतेने पाणी भरत नाही तोपर्यंत पंप सुरू ठेवण्याचे आदेश आमदार रहांगडाले यांनी संबंधित विभागाला दिले. यावेळी धापेवाडा टप्पा क्रमांक-२ च्या पाइपलाइनकरिता पंप हाऊसचे निरीक्षणसुद्धा त्यांनी केले असून, खैरबंधा जलाशयाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या २६ गावांतील १०७७१ हेक्टर जमिनीला यावर्षी खरीप धान पिकाला सिंचनाचा लाभ होणार असून, शेतकऱ्यांसमोर उद्भवलेला सिंचनाचा प्रश्न कायम सुटणार आहे. याप्रसंगी डॉ. चिंतामण रहांगडाले, डॉ. वसंत भगत, स्वानंद पारधी, मक्रम लिल्हारे, धनेंद्र अटरे, डॉ.बी.एस. रहांगडाले, लक्ष्मण चौधरी, गुलाब कटरे, दिलेश पारधी, राजेश उरकुडे, नेहरू उपवंशी, बंटी श्रीबांसरी, प्रमोद गौतम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.