गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली. जिल्हा आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्या २० हजार नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यात म्युकरमायकोसिसचे ४४ रुग्ण आढळले. यापैकी १७ रुग्णांवर नागपूर आणि गोंदिया येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली, तर १४ रुग्णांवर गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मागील दोन महिन्यांत म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. मात्र, या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञ आणि इएनटी तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या रुग्ण संख्येत अधिक वाढ झाली. या मागील मुख्य कारण म्हणजे अधिक काळ आयसीयूमध्ये उपचार घेणे, स्टेराॅईडचा वापर, ऑक्सिजनच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेराॅइडयुक्त औषधांचे सेवन करणे यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ झाली. मधुमेह, तसेच इतर गंभीर आजार असलेल्या आणि कोरोनातून बरे झालेल्या या रुग्णांना या आजाराचा सर्वाधिक धोका होता. त्यामुळेच आरोग्य विभागाने कोरोनामुक्त झालेल्या २० हजार नागरिकांचे म्युकरमायकोसिसच्या अनुषंगाने सर्वेक्षण केले असता त्यात ४४ रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांचा नागपूर आणि गोंदिया येथे मृत्यू झाला. मात्र, आता रुग्ण संख्येला ब्रेक लागला आहे.
.............
१७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत म्युकरमायकोसिसच्या एकूण १७ रुग्णांवर गोंदिया येथील शासकीय महाविद्यालय आणि खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हे रुग्ण सध्या स्वस्थ असून त्यांच्यावर शासकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग तज्ज्ञांचे लक्ष आहे, तर लक्षणे आढळलेल्या १४ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्ररोग विभागात उपचार सुरू आहेत. पाच रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
.......
ही आहेत म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून कोरोनातून बरे झालेल्या, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना या आजाराची लागण अधिक होते. या आजाराचा शिरकाव नाकावाटे होत असून सायनस होऊन पुढे डोळ्यात आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. यामुळे बरेचदा डोळा आणि जबडासुद्धा काढावा लागतो. ओठ, नाक, जबड्याला प्रामुख्याने या आजाराचा संसर्ग होत असतो.
.....................
लक्षणावर ठेवा लक्ष
डाेळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात, हिरड्या दुखणे, दात ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम होणे ही म्युकरमायकोसिसची लक्षणे आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा.
.........
ही घ्या काळजी
रक्तातील साखरेची एचबीएवनसीची तपासणी, रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण, कोविडनंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा. स्टेराॅइडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायमध्ये निर्जंतूक पाण्याचा वापर करा आणि अँटिबायोटिक्स व ॲन्टिफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. या आजाराची लक्षणे दिसता त्वरित उपचार करा.
.......
औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध
- म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णावर प्राथमिक अवस्थेत उपचार केल्यास तो लवकर बरा होतो. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना एम्फोटिरिसिन बी हे इंजेक्शन दिले जाते.
- एम्फोटिरिसिन बी हे इंजेक्शन हे महागडे इंजेक्शन असून सुरुवातीला या इंजेक्शनचा आणि यावरील औषध गोळ्यांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, सध्या औषधांचा पुरेसा साठा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहे.
- महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या आजारावर उपचार करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
.................
कोट :
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसच्या अनुषंगाने लक्षणे आढळत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ रुग्णांची नोंद झाली असून १७ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे दिसताच उपचार केल्यास या आजारावर नियंत्रण मिळविता येते.
.................