गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या पोटी जन्म झाला, त्यांनी विनयाच्या वाटेवरून चालले पाहिजे. ही विनयाची वाट बुद्ध धम्माकडे जाते, या परिस्थितीत आपल्याला कोण फसवतो, कोण नाराज करतो, यांच्या यंत्रणा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. आपली दिशाभूल कोण करीत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. युवराज गंगाराम यांनी केले.
कवी महेंद्र कोल्हटकर यांच्या ‘तळमळ’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी गंगाझरीचे साहित्यिक व भाषेचे अभ्यासक प्रा. विजयेंद्र सुरवाडे, आंबेडकरवादी साहित्यिक प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. माणिक गेडाम, प्रा. ज्योतिक ढाले, प्रा. रोशन मडामे, प्राचार्य जीवानी, प्रभाकर दहीकर, हरिराम येळणे, राजानंद वैद्य, विजय वासनिक उपस्थित होते. संचालन आंबेडकर साहित्यिक व कवी मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. आभार संतोष श्यामकुवर यांनी मानले. कार्यक्रमासाठी विनम्रता कोल्हटकर, उमा गजभिये, रामटेके, वासनिक व श्यामकुवर यांनी सहकार्य केले.