गोंदिया : जीवनात अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. प्रचंड मेहनत करून जगातील कुठलीही गोष्ट आपण सहज मिळवू शकतो. स्पर्धा परीक्षा व करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचा आदर्श ठेवून निश्चित ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ग्राम धापेवाडा येथे जोशाबा वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त वतीने सर्व समाजातील घटकांंमध्ये शिक्षणाचा प्रचार-प्रसार, शैक्षणिक जनजागृती, स्पर्धा परीक्षा व करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, रोशन गेडाम, प्रा.विनोदकुमार माने, राहुल मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला दीपप्रज्वलन व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी कांबळे यांनी, घोकमपट्टी नको तर प्रत्यक्ष ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे. अंगी आत्मविश्वास बाळगणे आवश्यक असून शून्यातून आपणाला जग निर्माण करता येते. प्रशासकीय क्षेत्रात आपणास करिअर करण्यासाठी आतापासूनच सतत अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गेडाम यांनी, नुसते स्वप्न पाहून भागणार नाही तर ती प्रत्यक्ष सत्यात उतरविण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत व आत्मविश्वास अंगी बाळगणे आवश्यक आहे असे सांगितले.
यादरम्यान ग्राम धापेवाडा येथील प्रथम नागरिक सरपंच दीपलता ठकरेले, ओमेश्वरी रहांगडाले, यमुना गेडाम, पंचशीला मंडीये यांच्या हस्ते पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह, पुस्तक, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन सुशील गेडाम यांनी केले. आभार प्रफुल्ल उके यांनी मानले. कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, जोशाबा वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी व पदाधिकारी डॉ. सुशील गेडाम, प्रफुल्ल उके,नितीन उके,अमित मेश्राम, वसंता गजभिये यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळकरी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
-----------------------
केंद्राला दिली पुस्तके भेट
कार्यक्रमात जोशाबा वाचनालय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास मेश्राम यांनी आपला वाढदिवस व स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेतर्फे स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे सोय होणार असून त्यांनी अधिकाधिक अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शन केले.