गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत भयावह आहे. या लाटेमुळे लोकांना किंवा आरोग्य यंत्रणेला सावरता आले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर जणू कोरोना हद्दपारच झाला, अशा बेफिकरीने लोक वागू लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूचे तांडव सुरूच असताना कोरोनापासून बचाव म्हणून मास्क वापरणे हाच पर्याय असल्याचे ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, अमेरिका’ यांनी म्हटले आहे. डबल मास्क ९५ टक्के कोरोनापासून बचाव करताे, असे तज्ज्ञांचे मत आहे. यासंदर्भात गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी चर्चा केली असता, त्यांनी डबल मास्क किंवा थ्री लेअर असलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला. घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सर्जिकल मास्क ५६ टक्के, कापडी मास्क ५१ टक्के, गाठ मारलेला मास्क ७७ टक्के, तर कापडी आणि सर्जिकल गाठ मारलेला मास्क ८६ टक्के फायदेशीर असल्याचे गोंदियाचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधने यांनी सांगितले आहे.
...................
हे करा
डबल मास्क घातल्यावर आपण स्वत:ला सुविधाजनक समजतो किंवा नाही, हे घरीच पाहावे. डबल मास्क घालून घरीच चालून व बोलून बघायला हवे, त्यामुळे चालताना किंवा बोलताना दम लागतो किंवा नाही, याची कल्पना आपल्याला येईल. पहिला मास्क कापडी असावा, दुसरा मास्क गाठ मारलेला सर्जिकल मास्क असावा.
- डॉ. प्रमेश गायधने, हृदयरोग तज्ज्ञ, गोंदिया.
..........
हे करू नका
दोन सर्जिकल मास्क किंवा एन ९५ मास्क एकासोबत वापरू नये, ते मास्क वापरल्यानंतर खराब झाल्यास त्यानंतर वापरू नये, मास्कवर स्प्रे करू नये, मास्क घातल्यानंतर नाकाजवळून जागा खुली राहू नये, मास्क घालताना चष्म्यावर तोंडातील श्वास जाणार नाही, अशी मास्कची बांधणी व वापरणे करा.
डॉ. भाग्यश्री भुतडा, रेडिओलॉजिस्ट
...........
मास्क कसा वापरावा?
- मास्क वापरल्यानंतर त्यात नाकाजवळून पोकळी राहू नये, चेहऱ्यावर मास्क तंतोतंत बसेल, असे मास्क वापरावे.
- मास्कला वारंवार हात लावू नका, मास्क घातल्यावर बोलताना आपले बोलणे समोरच्याला स्पष्ट ऐकायला जावे म्हणून काही लोक मास्क काढून हनुवटीवर लावतात. तसे करू नका.
- वापरलेला मास्क कुठेही उघड्यावर टाकू नका. कापडी मास्क लावत असाल, तर वापरल्यानंतर सरळ सर्फ असलेल्या पाण्यात टाका.
....
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मास्क हाच पर्याय
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने प्रत्येकाने तोंडाला थ्री लेअर असलेला मास्क वापरावा किंवा डबल मास्क वापरावा, जेणेकरून कोरोनाच्या संसर्गापासून आपला बचाव करता येईल. डबल मास्क किंवा लस हे दोन कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य आहेत.
......
जिल्ह्यातील एकूण कोरोनाचे रुग्ण- ३४४०५
बरे झालेले रुग्ण-२८८९०
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-४९५६
होम आयसोलेशनमधील रुग्ण-३५२०
............
मृत्यूदर-१ टक्के
पॉझिटीव्हीटी रेट- ८.४ टक्के
.....