केशोरी : जिल्ह्यात कोरोना विषाणू पुन्हा डोकवर काढू पाहत असताना या भागातील नागरिक मात्र कोरोना संबंधीच्या नियमांना बगल देत आहे. लग्नसमारंभात मास्कच्या वापराकडे आणि फिजिकल डिस्टन्सिंगकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनाने लग्न समारंभ आटोपण्यासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची अट घालून दिली असताना लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होताना दिसत आहे. तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांच्याकडून लग्नसमारंभास परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. परंतु अनेक कुटुंब प्रमुखाकडून परवानगी घेतली जात नाही शिवाय लग्नातील उपस्थितांनी फिजिकल डिस्टन्सिंग, प्रत्येकाने मास्कचा वापर करणे आदी अटी व शर्तीच्या अधीन राहूनच लग्नसमारंभ आटोपण्यावर प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत, मात्र या सूचनांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. लग्न समारंभात उपस्थितांची मर्यादा घालून दिली असली तरी प्रत्यक्षात लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोना नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय कोणाकडून ही होताना दिसत नाही. कोरोनाची कसलीही भीती न बाळगता या परिसरात लग्नसमारंभ धुमधडाक्यात सुरू आहेत.