गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आठवडी बाजार, गुरांचे बाजार तसेच कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षक केंद्र हे सर्व बंद ठेवण्यात आले होते. आठवडी बाजार तीन महिन्यांपासून, तर कोचिंग क्लासेस मागील दीड वर्षांपासून बंद आहे. पण जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने निर्बंध शिथिल करीत आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने, तर कोचिंग क्लासेस २० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी बुधवारी (दि.२३) काढले आहेत.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने राज्य सरकारने रुग्णाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची संख्या या दोन बाबी लक्षात घेऊन पाच स्तरात निर्बंध शिथिल केले. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १ टक्केच्या आतच असल्याने जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार अनलॉक करण्यात आले; तर दर गुरुवारी जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन निर्बंध कठोर अथवा शिथिल केले जात आहेत. मात्र संसर्ग आटोक्यात आला असला, तरी आठवडी बाजार आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे यावरील निर्बंध केव्हा शिथिल केले जातात, याकडे लक्ष लागले होते. बुधवारी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवागी दिली, तर कोचिंग आणि संगणक क्लासेससुध्दा २० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायती व कोचिंग क्लासेस संचालकांना दिलासा मिळाला; मात्र यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यासाठी नगर परिषद आणि उपविभागीय कार्यालयाच्या पथकांची या सर्वांवर बारीक नजर राहणार आहे.
...............
तीन स्तरावर राहणार पथके
आठवडी बाजार, संगणक आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र बाजारात गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना घ्यावी लागणार आहे; तर कोचिंग क्लासेसमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी न. प. मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणाखाली समिती व पथकाची नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.
..............
संसर्ग वाढल्यास निर्बंध पुन्हा होणार कठोर
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून, याचा दर गुरुवारी आढावा घेतला जात आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास निर्बंध कठोर केले जातील, असे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू न देण्यासाठी जिल्हावासीयांना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.