तिरोडा : आठवडी बाजार व शहरातील दुकाने रविवारीही रात्री १० वाजेपर्यंत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री नवाब मलिक व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्यापुढे मांडली. त्याच्या मागणीवर अखेर जिल्हाधिकारी गुंडे यांनी आदेश काढल्याने आता अवघ्या जिल्ह्यातील आठवडी बाजार व दुकाने रविवारीही रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
येथील आठवडी बाजार रविवारी भरतो; पण कोरोना नियमांमुळे मागील काही दिवसांपासून आठवडी बाजार बंद, तसेच शहरातील सर्व दुकाने रविवारी बंद करण्यात आली होती. सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत व शनिवारी फक्त दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील, असे नवीन आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. या नियमामुळे शहरातील व्यापारी त्रासला होता. शनिवारी (दि.१४) येथे आमदार वंजारी यांची स्थानिक व्यापाऱ्यांनी भेट घेऊन माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या मार्गदर्शनात रविवारचा साप्ताहिक बाजार व शहरातील दुकाने प्रत्येक रविवारी सुरू करण्याची मागणी निवेदनातून केली होती. आमदार वंजारी यांनी व्यापाऱ्यांची ही मागणी येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री मलिक व जिल्हाधिकारी गुंडे यांच्या समक्ष मांडून त्वरित रविवारसह आठवड्यातील सर्वच दिवशी सर्व दुकाने व आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी केली.
यावर तिरोडापाठोपाठ संपूर्ण जिल्ह्यात रविवारसह सर्वच दिवशी आठवडी बाजार व सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा समाप्त होताच त्वरित काढले. शनिवारच्या या नवीन आदेशामुळे येथील व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त करीत व्यापारी प्रतिनिधी हाजी मोहम्मद शेख, सैयद साबीर अली, राजा पुरुषलानी, रॉकी ग्यानचंदानी, नरेश वत्यानी, असगर अली सैयद यांनी आभार मानले आहे.