तहान भागविली : पावसाने कोटा पूर्ण केला सिंचनाचीही सोय होणार जिल्ह्यातील पुजारीटोला व इटियाडोह या दोन प्रमुख जलाशयांतून शेतीला सिंचन केले जाते. पांटबंधारे विभागाकडून शेतीच्या सिंचनासाठी तसे नियोजन केले जाते व पाणी सोडण्यात आले. मात्र पाणीसाठा कमी असल्याने त्यांनाही भविष्याची चिंता होती. अशात मागच्या आठवड्यातील पावसाने त्यांना चिंतामुक्त केले. आज प्रकल्पांत मुबलक पाणी असून यातून सिंचनाची सोय केली जाऊ शकते. गोंदिया : मागील रविवारपासून (दि.११) तीन दिवस बरसलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांची तहान भागली असून सर्वच जलाशय पाण्याने लबालब झाले आहेत. आज जिल्ह्यातील चारही प्रमुख जलाशयांत ७५ टक्केच्यावर पाणीसाठा आहे. यामुळे मात्र येणाऱ्या काळातील पाण्याची समस्या सुटणार हे विशेष. अवघा पावसाळा निघून गेला असतानाही जलाशये तहानलेलीच होती. नाममात्र पाणीसाठा असल्याने येणारा काळ कठीणच दिसून येत होता. त्यात शेतीच्या सिंचनाची सोय करावयाची असल्याने पुढे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. ‘पोळा आणि पाणी झाला भोळा’ असे म्हटले जाते. मात्र वरूणराजाने यंदा ही म्हण खोटी ठरविली. पावसाळा आता संपलाच असे दिसून येत असतानाच मात्र पावसाने दमदार एंट्री मारली. ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या तीन दिवसांत पावसाने अवघ्या जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले व आपला कोटा पूर्ण केला. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख चारही जलाशये लबालब भरली. एवढेच नव्हे तर जलाशयांचे गेट उघडून त्यातून पाणी सोडण्या इतपत वेळ आली होती. या पावसामुळे जलाशये चांगलीच फुल्ल झाली व व त्यामुळे वर्षभराची कसर पूर्ण करीत भविष्यातील पाण्याची समस्याही परतीच्या पावसाने सोडवून दिली. (शहर प्रतिनिधी)
आठवड्यातील पावसाने जलाशय तुडुंब
By admin | Published: September 19, 2016 12:25 AM