लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने सोमवारपासून (दि. २) कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री व इतर मंत्र्यांनी दिले होते. मात्र मागील दोन दिवसात केरळ राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने व डेल्टाच्या पार्श्वभूमीवर निर्णय तूर्तास बाजूला ठेवण्यात आला असून पुन्हा आठवडाभर निर्बंध कायम ठेवण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रुग्णसंख्येतसुध्दा फारशी वाढ होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच रुग्ण नाहीच्या बरोबरीत असलेल्या २६ जिल्ह्यांतील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे शिथिल करून केवळ शनिवारी आणि रविवारी कडक लाॅकडाऊन ठेवण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. तसे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. पण मागील काही दोन दिवसात रुग्णसंख्येत थोडी वाढ झाली. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता आणि डेल्टाचा धोका या पार्श्वभूमीवर आणखी आठवडाभर निर्बंध शिथिल न करता ते तसेच लागू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळेच सोमवारपासून (दि. २) निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील कुठलेच आदेश जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले नव्हते. तर यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असता आणखी आठवडाभर निर्बंध कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याचा विषय आता पुन्हा आठवडाभर लांबणीवर गेला आहे. शासन यावर नेमकी काय भूमिका घेते याकडे व्यापाऱ्यांसह सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
दीड वर्षापासून व्यापाऱ्यांना बसतोय फटका - मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असून कोरोनाच्या निर्बंधाचा फटका लहान मोठे व्यापारी आणि उद्योजकांना बसला आहे. त्यातही सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने याचा मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. संसर्ग आटोक्यात, मग अडचण काय ?- गोंदिया जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ११ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तीन तालुके कोरोनामुक्त आहेत. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करावे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे करण्याची अट ठेवावी अशी मागणीसुध्दा व्यापाऱ्यांनी केली आहे.