तीन तास लोकांची लाही-लाही : शेतीलाही बसतोय फटका लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : मे महिन्याची रणरणती उन्ह आणि त्यावर भर दुपारी भारनियमनाचा तीन तासांचा फटका यामुळे तालुक्यात लोकांचे दुपारचे जीवन कठिण झाले आहे. उष्णतेमुळे जीवाची लाही-लाही होताना दिसत आहे. दरवर्षी मे महिना हा सर्वोच्च उष्णतेचा असून ‘मे हीट’ चा फटका हा परमोच्च असतो. या महिन्यात स्वत:ला उष्णतेपासून सांभाळून ठेवणे मोठे आवाहन असते. बाहेर ४५ डिग्री सेल्सियसच्या जवळ तापमान प्रत्येक जीवाला त्राही त्राही करुन सोडणारे असते. अशात लोक घराबाहेर निघण्याचे टाळतात व दार खिडक्या लावून कुलर व पंख्याच्या हवेत विश्रांती घेणे पसंत करतात व तसे करणे शरीराला हितकारक ठरते. परंतु एवढ्यात वीज नसेल तर घरात राहूनही काय अर्थ. सध्या वीज विभागाने ऐन दुपारी गर्मीच्या वेळी ३ वाजतापासून वीज कपात सुरू केलेली आहे. ती ५.३० किंवा ६ वाजतापर्यंत असते. ३ ते ५ वाजताचा कालावधी हा अती उष्णतेचा असून यादरम्यान घराबाहेर पडणे मोठे जीवघेणे वाटत असते व घराबाहेर निघण्याची मुळीच इच्छा होत नाही. परंतु याच कालावधीत भारनियमन सुरू झाल्याने घरात राहणे सुद्धा कठिण झाले आहे. अशात जीवाची लाही-लाही होत आहे. धानपिकालाही फटका धानपिकाला पाण्याची नेहमी गरज असते. परंतु गर्मी वाढल्याने पाणी लवकर आटते. त्यामुळे शेतीला सतत पाणी पुरवठा करणे आवश्यक असते. तीन तासांचे भार नियमन सुरु झाल्याने धानपिक ही धोक्यात आले आहे. पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून भार नियमनाचा फटका पिकांनाही बसत आहे.
तापमानात भारनियमनाचा फटका
By admin | Published: May 07, 2017 12:19 AM