ग्रामस्थांमध्ये जागृती : ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट;पर्यावरणाच्या संतुलनावर भर लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे, गावकऱ्यांना वृक्षांबद्दल आवड निर्माण होऊन वृक्ष संगोपनासाठी त्यांनी पुढे यावे, सामान्य जनतेमध्ये वृक्षासंबंधी जागृती होण्याच्या हेतूने राज्याच्या वनविभागाच्यावतीने आकर्षक चित्ररथाचे भ्रमण करण्यात येत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव येथे चित्ररथाचे आगमन होताच अर्जुनीवासीयांकडून मनापासून स्वागत करण्यात आले. येत्या १ जुलै ते ७ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनतेमध्ये वृक्षसंगोपनाबद्दल आकर्षण वाढावे या मनीषेतून आकर्षक वाहनात तयार केलेल्या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम वनविभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वनविभागाच्या कार्यालयात चित्ररथाचे आगमन झाल्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले, सामाजिक वनीकरणाचे लागवड अधिकारी पडोळे, प्राध्यापक शरद मेश्राम, क्षेत्र सहायक दखने, दहिवले, पंधरे प्रामुख्याने उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात आलेल्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतानी तहसीलदार बोंबर्डे म्हणाले की, वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या वतीने सर्व यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांनी वनांची महती विशद करताना सांगितले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. पर्यावरणाचग संतुलन ढासळत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी वनांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. गावागावात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षांना आपले सगे-सोयरे समजून त्यांच्यावर प्रेम करणे आवश्यक आहे. येत्या १ जुलैच्या वनमहोत्सवात सहभागी होऊन विक्रमी वृक्ष लागवड करण्यचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. चित्ररथाद्वारे करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची जबाबदारी तयार होईल व हिरवे वातावरण निर्माण करणे सोईचे होईल, हा यामागे हेतू आहे. याप्रसंगी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, वनसमितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनविभागाच्या ‘चित्ररथाचे’ स्वागत
By admin | Published: May 08, 2017 12:56 AM