गोंदिया : पंचायत समिती गोंदिया अंतर्गत तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायत लोहाराच्या वतीने विहिरीची तोंडी व फलाटाचे काम कंत्राटदारीने केले जात आहे. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप लोहारा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.ग्रामपंचायत सदस्यांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता, त्यांना विश्वासात न घेता आपल्या मनमर्जीप्रमाणे विहिरीची तोंडी व फलाटाचे काम सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्यांनी मौक्यावर जावून चौकशी केली असता फलाटाच्या पायात काँक्रिट न घातला मुरूम घालून प्लास्टर केल्याचे आढळले. सदर विहिरीची तोंडी व फलाट निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार पं.स. गोंदियाचे खंडविकास अधिकारी यांना करण्यात आली. संबंधित बांधकाम विभागातील अभियंता बुराळे यांनी मौक्यावर पाच विहिरींची पाहणी केली. दोन विहिरींचे काम बाकी आहे. सदर काम ग्रामपंचायत सदस्यांसमोर बंद करण्यात आले. ग्रामसेवक जोपर्यंत इस्टीमेट दाखविणार नाही तोपर्यंत काम सुरू करायचे नाही, असे बुराडे यांनी सांगितले. तरीसुद्धा ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांचे न ऐकता सरपंच आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मौक्यावर येवून चौकशी करावी, शासकीय इस्टीमेटप्रमाणे काम करण्यात यावे, तसेच तक्रारीवर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ग्रा.पं. सदस्य जितेंद्र ढेकवार, ग्रा.पं. सदस्य धनराज परतेती, भावना रंगारी, खुमेश्वरी नागपुरे, भाऊलाल परतेती, तेजराम नागपुरे, उषा राऊत, भोजराज कटंगकार, उमन नागपुरे, रेखलाल उके, नरेश उके, उमेश बिसेन, रामेश्वर ठाकरे, किशोर बयटवार, रामचंद्र ढेकवार, पुरूषोत्तम राऊत, काशिनाथ नाईक, खुनीला परतेती, चंदन परतेती, देवीलाल नागपुरे, केवल लिल्हारे, पुरण ढेकवार, दिलीप नागपुरे, दिनेश चन्ने आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)
विहिरींचे तोंड व कठडे निकृष्ट
By admin | Published: April 09, 2015 1:03 AM