लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्धा पावसाळा लोटला असतानाही आतापर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरींत ब्लिचींग पावडर टाकण्यात आलेले नाही. नगर परिषद पाणी पुरवठा विभागाने यासाठी निविदा काढली असून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी त्यांची गाडी अडकली आहे. अशात सार्वजनिक विहिरींतील पाणी आरोग्यास धोकादायक ठरू शकते. मात्र नगर परिषद प्रशासनाला याचे काहीच सोयरसुतक दिसत नाही.पावसाळा म्हणजे आजारांचा काळच म्हटला जातो. पावसाळ््यात सर्वाधीक आजार पाण्यातून पसरतात. यामुळेच आरोग्य विभागाकडूनही पाणी स्वच्छ करून व उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. एकंदर पिण्याचे पाणी स्वच्छ असणे गरजेचे आहे यातून स्पष्ट होते. अशात आता ज्यांच्याकडे नळ आहेत ते नळाचे व फिल्टर करून पाणी पितात. मात्र आजही शहरातील कित्येकांकडे नळ नसल्याने ते सार्वजनिक विहिरींचे पाणी पीत आहेत.येथे मात्र आश्चर्य व धोक्याची बाब अशी की, शहरात असलेल्या ५६ सार्वजनिक विहिरींना अद्याप ब्लिचींग पावडरचा डोज देण्यात आलेला नाही. पावसाळ््यात दरवर्षी नगर परिषदेकडून शहरातील या सार्वजनिक विहिरींत ब्लिचींग पावडर टाकले जाते. यंदा मात्र मांजर कोठे आडवी आली, या सार्वजनिक विहिरींत अद्याप ब्लिचींग पावडर टाकण्यात आलेले नाही. आता अर्धा पावसाळा लोटला असून नगर परिषदेचे एवढ्या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याने पालिकेचे कामकाज शहरवासीयांप्रती किती तत्परतेने चालत आहे याची प्रचिती येते.दरांच्या मंजुरीसाठी अडकली गाडीनगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता उमेश शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुमारे दोन महिन्यांपुर्वी ब्लीचींग पावडरसाठी निविदा टाकली होती. आता निविदा उघडली असून दरांच्या मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभेत हा विषय मांडल्याचे सांगीतले. मात्र गुरूवारची (दि.१९) स्थायी समितीची सभा स्थगित झाल्याने ब्लिचींग पावडर दर मंजुरीचा विषय अडकला. आता स्थायी समितीची सभा कधी होणार हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे तोवर ब्लिचींग पावडर खरेदी करता येणार नाही हे पक्के.शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळआजही कित्येक परिवार विहिरीतील पाणी पीत आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशात ब्लिचींग पावडर अभावी पाण्यामुळे आजार पसरल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न येथे पडत आहे. यातून नगर परिषद प्रशासन शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, सर्वसाधारण सभेत नगर परिषद सदस्यांनी नगर परिषद प्रशासन व्यवस्थीत काम करीत नसल्याचा आरोप खरा असल्याचे येथे स्पष्ट होत असल्याचेही दिसून येत आहे.
शहरातील विहिरींना ‘ब्लिचिंग’चा डोज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 8:53 PM
अर्धा पावसाळा लोटला असतानाही आतापर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरींत ब्लिचींग पावडर टाकण्यात आलेले नाही. नगर परिषद पाणी पुरवठा विभागाने यासाठी निविदा काढली असून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी त्यांची गाडी अडकली आहे.
ठळक मुद्देअर्धा पावसाळा लोटला : नगर परिषद प्रशासनाचा अजब कारभार