मंगळवारपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून गोंदिया-बल्लारशा गाडी सकाळी ७.४० सुटणार आहे, तर बल्लारशावरून हीच गाडी परत दुपारी २.४० ला सुटणार आहे. मात्र, गोंदियावरून बल्लारशाला सकाळी जाणे सोयीचे होणार असले तरी याच गाडीने जाऊन आपली कामे करून परत येण्यासाठी गाडी नसणार आहे. तर बल्लारशावरून सकाळी ६.३० वाजता सुटणारी गाडी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे गोंदियाला सकाळी येऊन परत जाण्यासाठीसुद्धा प्रवाशांना कुठलीच गाडी असणार नाही. त्यामुळे ही गाडी दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. जेव्हापर्यंत बल्लारशाहून सकाळी ६.३० गोंदियासाठी गाडी सुरू होणार नाही आणि गोंदियावरून सायंकाळी ५ वाजता बल्लारशाकडे जाण्यासाठी पँसेजर गाडी सुरू होणार नाही. तेव्हापर्यंत या गाडीचा दोन्ही जिल्ह्यांतील रेल्वे प्रवाशांना कुठलाच फायदा होणार नाही. त्यामुळे दोन्हीकडे जाण्यासाठी पूर्वीप्रमाणेच रेल्वे गाड्या सुरू करण्याची गरज आहे. तरच हे दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी सोयीचे होईल, अन्यथा ही गाडी सुरू करून कुठलाच फायदा होणार नाही.
................
गोंदिया-जबलपूर गाडी सुरू करा
रेल्वे विभागाने हळूहळू सर्वच गाड्या सुरू केल्या असल्या तरी अद्यापही गोंदिया-जबलपूर गाडी सुरू केली नाही. ही गाडी सुरू न करण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा दबाब असल्याची चर्चा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स सुरू असून गोंदिया ते जबलपूरसाठी ४०० रुपये प्रवास भाडे द्यावे लागते, तर रेल्वेने यासाठी केवळ १०० रुपये लागतात. रेल्वे गाडी सुरू झाल्यास ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही गाडी सुरू केल्या जात नसल्याची माहिती आहे.