जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय अजित पवार : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघावरील दावा कायम
By अंकुश गुंडावार | Published: March 7, 2024 05:31 PM2024-03-07T17:31:26+5:302024-03-07T17:31:50+5:30
प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना.भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले.
गोंदिया : आगामी लोकसभा निवडणुकीकरीता महायुतीत जागा वाटपावरुन सध्या बैठका आणि चर्चेचे सत्र सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जेवढ्या जागा शिवसेनेला मिळतील तेवढ्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात असे मत व्यक्त केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी जागांवर दावा सांगण्यात चुकीचे काय आहे. ना. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना.भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले.
गोंदिया तालुक्यातील सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरुवारी (दि.७) करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीला घेवून जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी महायुतीमध्ये सहभागी प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरु आहे. जागांवर दावा सांगण्याचा अधिकार हा सर्वांनाच आहे. मात्र शेवटी सगळे मिळून वाटाघाटी करू यावर तोडगा काढला जाईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
धमकी प्रकरणाची माहिती घेतो
माझे नाव शरद पवार आहे असे सुनील शेळके यांनी विसरावे नाही अशी धमकी दिल्याची चर्चा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता याबद्दल मला काही माहीत नाही. यासंदर्भात मी सुनील शेळके यांच्याशी बोलून माहिती घेणार यानंतरच यावर बोलणार असे सांगितले.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर दावा कायम
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा आमच्या हक्काची असून ही जागा राष्ट्रवादीने अद्याप सोडलेला नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार नाही असे कुणीही गृहीत धरु नये, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी केेले. खा. पटेल यांनी गोंदिया व भंडारा येथील अपक्ष आमदार आमच्या राष्ट्रवादीमुळे निवडून आले. पण ते आज इकडून तिकडे फिरत आहेत. त्यानांही वेळेवर जागा दाखवण्याची वेळ येणार आहे. भेल प्रकल्पाची २०१४ मध्ये जे निवडून लोकसभेत गेले त्यांनी वाट लावली. अशी टिकाही कुणाचेही नाव न घेता खा. पटेल यांनी केली.