गोंदिया : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला चक्क तिसरा डोस देण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात उघडकीस आला आहे. तिसऱ्या डोसमुळे कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, तरी यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. शिवाय लस घेणाऱ्यांचे रेकॉर्ड या केंद्रामध्ये उपलब्ध असते की नाही, यावरसुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोना लसीकरणाकरिता आधी कोविन ॲपवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर केंद्रावर पोहोचल्यानंतर आधार क्रमांक टाकून त्याची या ॲपवर पडताळणी केली जाते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरच लसीकरणासाठी पाठविले जाते. मात्र यानंतर काही लसीकरण केंद्रांवर सावळा गोंधळ उडत आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना चक्क तिसरा डोस दिला जात आहे. असाच प्रकार गोंदिया तालुक्यातील बिरसोला येथील प्राथमिक उपकेंद्रात उघडकीस आला. एका व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. या तो पुन्हा लसीकरण केंद्रावर गेला असता, त्याची पडताळणी न करताच त्याला तिसरा डोस देण्यात आला. ही बाब या व्यक्तीने सांगितल्यानंतर उघडकीस आली. लसीचा तिसरा डोस घेतल्याने कुठलाही दुष्परिणाम झाला नसला, तरी आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा यामुळे उघडकीस आला आहे. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता, या उपकेंद्राकडे लसीकरणाचा अहवाल योग्य ठेवला जात नसल्याची बाब उघडकीस आली. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. याची तक्रारसुध्दा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कुठली कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.