कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली व्याघ्र प्रकल्पात मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक हजेरी लावत असतानाच येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २ वर्षांत फक्त एकाच विदेशी पर्यटकाने हजेरी लावल्याची माहिती आहे. यावरून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प प्रचार-प्रसारात कोठेतरी कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे पडणार नाही. माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याची गरज भासत आहे. यासाठी वनविभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, जंगलातील नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे जास्त दिसत आहे. जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते; मात्र शोकांतिका अशी की, राष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसारा कोठेतरी कमी पडत असल्याचे दिसते. कारण या प्रकल्पात विदेशी पर्यटकांची हजेरी नावापुरतीच आहे. सन २०२०-२१ व २०२१-२२ या काळात प्रकल्पात एकाही विदेशी पर्यटकाने हजेरी लावली नसून सन २०२२-२३ मध्ये मे महिन्यात जर्मन देशातील फक्त एका विदेशी पर्यटकाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा प्रकल्पाला देशातील नावाजलेले व्यक्ती भेट देतात. शिवाय मोठ्या संख्येत विदेशी पर्यटकांचाही यात समावेश असतो. लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली प्रकल्पातही मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक येतात. नागपूर येथील विमानतळावर विदेशी पर्यटकांचे आगमन झाल्यानंतर त्यांना गोंदिया होत कान्हा केसली हाच सोयीचा मार्ग ठरतो. शिवाय, नागपूर येथून गोंदिया अत्यधिक जवळ असूनही ते नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट न देता इतरत्र जात आहे ही शोकांतिका आहे. वनविभागाने यावर मंथन करण्याची गरज आहे.
३ महिन्यात १२५५६ पर्यटकांची भेट - कोरोनामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये व्याघ्र प्रकल्प ऐन हंगामातच बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर आता सन २०२२-२३ मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू असून त्यातही ऐन हंगामात सुरू असल्याने मार्च, एप्रिल व मे या ३ महिन्यांत व्याघ्र प्रकल्पात १२५५६ पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. यासाठी २३४३ वाहनांना प्रवेश देण्यात आला असून वन्यजीव विभागाला तब्बल २६,९२,५०० रुपयांचे उत्पन्न आले आहे.