लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मुंबई येथे पार पडलेल्या मंथन बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प. आणि प.स.च्या पोटनिवडणुकीनंतर जि.प.मधील युती तोडणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिका अर्जुन खरगे यांच्यासमोर दिली होती. पोटनिवडणूक होवून महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी जि.प.तील युती तोडण्याबाबत कुठलीच पाऊले उचलण्यात आली नाही. त्यामुळे जि.प.तील युतीचा ब्रेकअप केव्हा अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.गोंदिया जि.प.मधील पक्षीय बलाबल पाहता राष्टÑवादी काँग्रेस २०, काँग्रेस १६ आणि भाजप १७ असे एकूण ५३ सदस्य संख्या आहे.राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करु शकले असते. शिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाची आघाडी होती.मात्र जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे केवळ राष्टÑवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने जि.प.मध्ये भाजपसह युती करुन सत्ता स्थापन करणे पसंत केले. अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजपचा असेच समीकरण मागील चार वर्षांपासून जि.प.मध्ये आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुध्दा या युतीचा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर आता दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा या युतीचा मुद्दा चर्चेत आहेत.विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आघाडी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जागा वाटप करताना पुन्हा जि.प.मधील काँग्रेस-भाजप युतीचा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.महिनाभरापूर्वीच काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे मंथन करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका मुंबई येथे घेतल्या होत्या. या बैठकीत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पराभवाचे खापर राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर फोडले होते. तेव्हाच जि.प.मधील युतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जि.प. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर जि.प. मध्ये भाजपसह असलेली युती तोडण्याची ग्वाही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर दिली होती. मात्र पोटनिवडणूक होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. पण युती तोडण्यासंदर्भात कुठल्याच हालचाली नसून या मुद्दावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुध्दा कुठलीही चर्चा करताना दिसत नाही. त्यामुळे जि.प.तील युतीचा मुद्दा चांगलाच गाजत असून युतीचा ब्रेकअप केव्हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.भाजप बिनधास्तकाँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जि.प.मधील युती तोडण्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींसमोर दिली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीनंतर युती तुटण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र यासंदर्भात भाजप जिल्हाध्यक्षांना विचारणा केली असता जि.प.तील युती तोडण्यासंदर्भात कुठलेच संकेत मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप बिनधास्त असल्याचे चित्र आहे.विधानसभा निवडणुकीत मुद्दा उपस्थित होणारदोन महिन्याने विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जि.प.मधील युतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते युती केव्हा तोडणार अशी आपसात चर्चा करीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा तोंडावर हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
जि.प.तील युतीचा ब्रेकअप केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:18 PM
गोंदिया जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मुंबई येथे पार पडलेल्या मंथन बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प. आणि प.स.च्या पोटनिवडणुकीनंतर जि.प.मधील युती तोडणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिका अर्जुन खरगे यांच्यासमोर दिली होती.
ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्षांना आश्वासनाचा विसर : पोटनिवडणुकीनंतर युती तोडण्याचे दिली होती ग्वाही