सालेकसा : आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील १३० गावांची धुरा केवळ ४० पोलिसांवर आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या नकाशात आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अशी सालेकसा तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा व सुरक्षा व्यवस्था चोखपणे सांभाळण्यासाठी पुरेपूर पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे.
सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत १३० गावे येतात. नियमानुसार ६३ पोलीस कर्मचारी असणे, आवश्यक आहे. मात्र ४० पोलीस कर्मचारी काम पाहत आहेत. मागील वर्षी गृहविभागाने १७ ते १८ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केली. आतापर्यंत केवळ चार कर्मचारी पाठविले आहेत. यात एक बालक व तीन पोलीस कर्मचारी देण्यात आले. सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत तिरखेडी, बिंझली, पिपरिया, सोनपुरी, सालेकसा, आऊटपोस्ट साखरीटोला या बिटांचा समावेश आहे. कोरोना काळात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही गावे पोलीस ठाण्यापासून २० ते २५ किलोमीटर अंतरावर येतात. तेथील तपास आणि गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. उल्लेखनीय म्हणजे, आमगाव व देवरी तालुक्यातील काही गावे सालेकसा पोलीस ठाण्याला जोडली आहेत. या गावांचाही कार्यभार कार्यरत पोलिसांना सांभाळावा लागतो. दरम्यान, गृहविभागाने सालेकसा पोलीस ठाण्यातील रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी होत आहे.
‘सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत रिक्त असलेली पोलीस कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्यात येतील. त्यादृष्टीने प्रक्रियासुध्दा सुरू करण्यात आली आहे.
अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक