लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकऱ्यांची दरवर्षीची खरिपातील अवस्था बघता शासनाने मागील काही वर्षांपासून शासकीय हमीभावासह शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस जाहीर केला. मागील वर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला होता. मात्र, यावर्षी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव वगळता बोनसची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर व्यक्त व्यक्त होताना दिसून येत आहे.
जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, येथील शेतकऱ्यांचे धान हे पीक मुख्य आहे. शिवाय बारीक पोत असलेल्या धान वाणाच्या विविध व्हरायटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संशोधनातून निर्माण झाल्या असून, देशविख्यात झाल्या आहेत. त्या धान वानाचे जनकसुद्धा सर्वदूर प्रसिद्ध झाले आहेत. या धान उत्पादक जिल्ह्यात खरिपात मोठ्या प्रमाणावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, येथे सिंचनाची अशी भरीव सुविधा अजूनपर्यंत निर्माण झाली नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणावरच शेतकऱ्यांना उत्पादन घ्यावे लागते. परिणामी दरवर्षी शेतकऱ्यांना कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ किंवा अन्य अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. धान शेतकऱ्यांची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी शासनाने बोनसची घोषणा केली; परंतु बोनस न दिल्याने शासनाप्रती शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.
मागील वर्षी मिळाला होता बोनसचा आधारकाही शेतकऱ्यांनी बोअरच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण केली आहे. अशा परिस्थितीमुळेच कदाचित शासनाने शेतकऱ्यांना थोडा आर्थिक आधार मिळावा म्हणून हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला व मागील वर्षीपर्यंत मिळाला सुद्धा. मात्र, यावर्षी तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा बोनस शेतकऱ्यांना मिळाला नाही.
बोनस शेतकऱ्यांसाठी मोठा आधारशासनाने खरीप हंगामातील धान पिकासाठी जवळपास दोन हजार ३०० रुपये हमीभाव जाहीर केला होता. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शासनाने बोनस जाहीर केला असता तर निश्चितच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढता आला असता व बोनसचा भक्कम आर्थिक आधार मिळाला असता; पण यावर्षी बोनस मिळाला नसल्याने शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेतच आहेत.
ऐनवेळी येतातच खरिपात कुठले ना कुठले संकटदरवर्षी खरिपाचा हंगाम पूर्णत्वास यायला लागला की, कुठले ना कुठले नैसर्गिक संकट पिकांवर येतेच. त्यामुळे शेतकऱ्यांचे सारे धैर्य खचून जाते. यावर्षीसुद्धा खरीप पिकाच्या शेवटच्या टप्प्यात काही भागांमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट आल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.
२० हजार रुपये हेक्टर बोनस शासनाने जाहीर केला होता. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.
"मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शासनाने योग्य वेळी बोनस द्यायला हवे होते. मात्र, यावर्षी चित्र वेगळे आहे. शासन बोनस देणार की नाही, हे अधांतरी आहे. मात्र, बोनस मिळेल या आशेवर शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. निदान मार्चनंतर तरी ही आशा पूर्ण व्हावी."- अरुण मेंढे, शेतकरी, शिलापूर