गोठणगाव : आदिवासी विकास उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधच्या सौजन्याने हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यापैकी एकट्या गोठणगाव हमीभाव धान खरेदी केंद्राचे धानाचे चुकारे बाकी आहेत. अद्यापही चुकारे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, खरीप हंगामात बी-बियाणे, खते आदींसाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
स्थानिक आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था येथे आदिवासी विकास उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत हमीभाव धान खरेदी केंद्र ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले. ३१ मार्चपर्यंत धानाची खरेदी केली; परंतु माहे फेब्रुवारी २०२१ पासून धानाचे चुकारे झालेच नाही. वनजमिनीच्या सातबाऱ्याचे चुकारे अडविण्यात आले. बाकी म्हणजे इळदा, केशोरी आणि कुंभीटोला येथील केंद्राचे वनजमिनीसह चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र, एकट्या गोठणगाव केंद्राचे वन जमिनीसंबंधी चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात आले नाहीत. संस्था सचिव संतोष चांदेवार यांच्याशी संपर्क केला असता संस्थेकडून आवश्यक ती कागदोपत्री पूर्तता केल्याचे सांगितले जात आहे. तरीपण आमच्या संस्थेचे चुकारे का अडविण्यात आले हे एक कोडेच आहे; परंतु गोठणगाव संस्थेच्या शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांबाबत कोणीही बोलायला तयार नाही. तरीपण शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची वेळ आले आहे. त्याकरिता पैशांची गरज असल्याने थकीत चुकाऱ्याची रक्कम त्वरित जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.