मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेगाव खुर्द येथील गावकरी मागील काही महिन्यांपासून विविध समस्यांनी त्रस्त आहेत. गावातील सौर ऊर्जेवरील नळ योजना मागील महिनाभरापासून बंद आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. परंतु ग्रामपंचायतीने या समस्यांची अद्यापही दखल घेतली नसल्याने गावकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.
नवेगाव खुर्द येथील लोकसंख्या १२०० असून हे गाव गोंदिया जिल्ह्याच्या अगदी शेवटच्या टोकावर आहे. गावात अनेक समस्या असून त्यांची अद्यापही सोडवणूक करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली पण गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. गावातील नाल्यात केरकचरा व पाणी साचलेले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावात बऱ्याच वर्षांपासून स्मशान शेड नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. या परिसरात छोट्याशा गावात स्मशान शेड आहेत. पण या गावात नाही ही बाब फार खेदाची वाटत आहे. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाते त्याठिकाणी बोअरवेलची व्यवस्था नाही. गावातील नळ योजना व नाल्या सफाईकडे येथील सरपंच व सचिव, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या समस्यांची दखल घेऊन त्या मार्गी कोण लावणार असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे.