तिरोडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होऊ नये त्यांना सर्व आरोग्यविषयक आवश्यक सेवा मिळाव्यात यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली; पण तज्ज्ञ कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याचे सांगत सोनाग्राफी, बाह्यरुग्ण तपासणी विभाग, गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी केली जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे सर्व सुविधा पूर्ववत केव्हा सुरू होणार, असा तालुक्यातील नागरिकांनी केला आहे.
महिनाभरापूर्वी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अभावाचे कारण सांगून त्यावेळी इतर रुग्ण सुविधा बंद करण्यात आल्या. याला आता महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटला असून आता येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये केवळ ५ रुग्ण असून त्यांच्या सेवेसाठी तब्बल ८ डॉक्टर्स असतानाही बंद केलेल्या सुविधा सुरू करण्यात आल्या नाहीत. गरोदर महिलांची तपासणी, सोनोग्राफी, प्रसूती, सिझर, दैनिक ओपीडी, आंतर रुग्ण विभाग आदी सर्व सेवांचा समावेश होता. आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार बंद असल्याने त्यांना पैशाची चणचण भासत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयात सेवा - सुविधा बंद असल्यामुळे अबालवृद्धांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
.......
अभिजीत वंजारी यांनी तिरोडा रुग्णालयाला भेट दिली
दोन दिवसांपूर्वी आ. अभिजीत वंजारी यांनी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला होता. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी येथील सोयी सुविधांच्या अभावामुळे होत असलेल्या अडचणींसंदर्भात त्यांना निवेदन दिले होते. यावर आ. वंजारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सुविधा पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; पण अद्यापही बंद असलेल्या सुविधा पूर्ववत सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.