गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भाव बंद केलेल्या पॅसेंजर आणि लोकल गाड्या अद्यापही रुळावर आलेल्या नाही. रेल्वे विभागाने महिनाभरापूर्वी गोंदिया-बल्लारशा मार्गावर दोन्ही ठिकाणाहून प्रत्येकी एकच पॅसेंजर गाडी सुरू केली आहे. एकच गाडी सुरू असल्याने प्रवाशांना कुठलाच उपयोग होत नसून उलट त्यांचा मनस्ताप वाढत आहे. त्यामुळे एक तर धावतेय दुसरी पॅसेंजर गाडी केव्हा सुरू करणार असा सवाल या मार्गावरील प्रवाशांनी केला आहे.
गोंदिया-बल्लारशा मार्गावर सध्या केवळ सकाळी ७.३० वाजताची एकच पॅसेंजर गाडी सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील इतर फेऱ्या आजही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सकाळची लोकल सुटल्यास दुसऱ्या दिवशीच जाण्याशिवाय पर्याय नाही. गोंदियासह सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची भिस्त या मार्गावरील पॅसेंजर रेल्वेगाड्यांवर आहे.
गोरेगाव तालुक्यातील गणखैरा, डव्वा, सटवा, पुरगाव, चिचगाव, गोरेगाव, या गावासह सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी, गोंगले, डव्वा, घोटी, खोडशिवनी, मालीजुंगा, सौंदड, गोंडउमरी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव, बाराभाटी, अरुणनगर, पिंपळगाव, झरपडा या गावातील नागरिकांना जिल्हा तर गोंदियाकडे येणारी रेल्वेगाडी रात्री ८ वाजता गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर पोहोचत आहे. त्यामुळे एखाद्या प्रवाश्याला या मार्गावरील एखाद्या गावी जायचे झाल्यास परत येताना थेट रात्रीची रेल्वेगाडीच एकमात्र पर्याय आहे. मुख्यालय अथवा शेजारच्या जिल्ह्यातील वडसा येथील बाजारपेठे ये-जा करण्यासाठी या मार्गावरील पॅसेंजर रेल्वेगाड्या सोयीच्या ठरतात, पण केवळ एकच गाडी सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
'या' मार्गावर पॅसेंजर का नाही?
रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी गोंदिया-बालाघाट-कटंगी मार्गावर पूर्वीसारख्या फेऱ्या सुरू केल्या; पण गोंदिया-बल्लारशाह मार्गावरील फेऱ्या सुरू केल्या नाही. इतर गाड्या सुरू करण्यात आल्या, मग या मार्गावरील पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू करण्यास नेमकी अडचण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एक्स्प्रेसचा थांबाही बंद
या मार्गावर चालणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा गोदियावरून सौंदड, अर्जुनी मोरगाव, नागभीड, मूल, चंद्रपूर या स्थानकावर देण्यात आला होता; पण सर्व सुपरफास्ट गाड्या सुरू असूनसुद्धा या स्थानकावर गाड्यांचे थांबे बंद आहे. परिणामी प्रवाशांना याचा कुठलाच लाभ होत नाही.