राजेश मुनीश्वर :
सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत शहराची कसलीच प्रगती झाली नाही. शहरवासीयांना अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे जाळे विस्तारण्यात आले नाही. रस्ते, स्वच्छता आणि इतर समस्या कायम आहेत. त्यामुळे या समस्यांचे ग्रहण नेमके सुटणार केव्हा, असा सवाल शहरवासीय नगरपंचायतीला करीत आहेत.
शहरवासीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटर फिल्टर लावण्यात आले होते; पण तेही शेवटची घटका मोजत आहे. शहरातील काही वॉर्डांत बोअरवेल नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. सार्वजनिक विंधन विहीर नसल्याने, एखादवेळी वीज नसल्यावर पाण्यासाठी हाहाकार होत असते. वॉर्ड क्रमांक १७ मध्ये दोन विंधन विहिरीची नितांत गरज आहे; पण त्याठिकाणी एकही विंधन विहीर नसल्याने वॉर्डांतील नागरिकांना इतरत्र भटकावे लागते.
नागरिकांना सायंकाळी फिरण्यासाठी गार्डन नाही.
सडक अर्जुनी तालुका होऊन ३१ वर्षे पूर्ण झालीत. तालुका झाल्याने लेआउटचा महापूर सडक अर्जुनी शहरात आला आहे. लेआउटमध्ये लोकांनी घरे बांधून शहराचे स्वरूप आले; पण जाण्यासाठी रस्ता नाही. घराचे सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नाहीत, काही वॉर्डांत नाल्या आहेत; पण रस्ते उंच झाल्याने नाल्या खाली झाल्या आहेत. नाल्यांमधील केरकचऱ्याची नियमित साफसफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुंदर गाव, हिरव्या गावची संकल्पना पूर्ण झालीच नाही, छत्तीस कोटी वृक्षलागवडीअंतर्गत प्रत्येक वॉर्डात वृक्षारोपण करण्यात आले होते; पण त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याने ही संपूर्ण झाडे वाळली आहेत.
............
झाडच झाले बसस्थानक
सडक अर्जुनी येथे बसस्थानक नसल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना चौकातील एका लिंबाच्या झाडाचा आश्रय घेऊन बस येण्याची वाट बघावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक नसलेले हे राज्यातील एकमेव ठिकाण असावे. मात्र, याकडे शासन, प्रशासनाचेसुद्धा लक्ष गेले नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे.
.........
समस्यांची दखल घेणार तरी केव्हा
शहरातील समस्यांसंदर्भात अनेकदा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, त्यांनी आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. या समस्यांची दखल घेऊन त्या मार्गी केव्हा लावणार असा सवाल प्रल्हाद कोरे, रेखा मुनीश्वर, रोशन बडोले, तुकाराम येरणे, राजेश फुले, प्रमिला कोरे, दुर्गा खोटेले, चिलिया ब्राह्मणकर, संजय मेंढे, देवीदास रुखमोडे, अंजली मुनीश्वर, विनोद बारसागडे यांनी केला आहे.