केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मोठ्या प्रमाणात मका उन्हाळी पिकाचे उत्पादन घेण्यात आले. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मका आदिवासी विकास महामंडळाने शासकीय आधारभूत केंद्रामार्फत खरेदी केला होता. तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही मका पिकाची चुकारे मिळाली नाहीत. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. धानाचे चुकारे नुकतेच शेतकऱ्यांना खात्यावर जमा झाले आहेत. मका पिकाचे चुकारे केव्हा मिळणार, असा सवाल मका उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाला केला आहे.
या परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळी मका पिकाचे झालेले उत्पादन आदिवासी महामंडळाच्या शासकीय आधारभूत केंद्र केशोरी, गोठणगाव, नवेगाव (बांध) या केंद्रावर विक्री केली. आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही मका पिकाचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाहीत. बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर रब्बी धान पिकाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. धानाचे चुकारे मिळण्यास शेतकऱ्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली, तशीच प्रतीक्षा मका पिकाचे चुकारे मिळण्यास करावी लागेल की काय? अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
.........
मक्का लागवड क्षेत्रात वाढ
रब्बी धानाचा पेरा कमी करून मोठ्या आशेने मका पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. या परिसरातील हजारो क्विंटल मका आदिवासी महामंडळाने खरेदी केला आहे. परंतु अजूनही खरेदी केलेल्या मका पिकाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. तीन महिन्यांचा कालावधी लोटून गेला आहे. मका उत्पादक शेतकरी चुकाऱ्याची प्रतीक्षा करीत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आदिवासी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि उन्हाळी मका पिकाची चुकारे त्वरित अदा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे.