गोंदिया : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना संसर्ग झाला व त्यात काहींचा जीव गेला. तर काही कोरोनाच्या महामारीतून बचावले. त्यात जीव वाचविण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च झाला. कुणी लाखो रूपय खर्च करूनही जग सोडून गेले. कित्येकांचा व्यवसाय बुडाला तर कुणी नोकरी सोडली. आता रोजगार नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली. अशा सर्वसामान्य लोकांनी पोट भरायचे की वीज बिल अशी व्यथा सर्वसामान्य लोकांची झाली आहे.
सलग २ वर्षे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हाताला रोजगार नाही, पोटाची खळगी भरताना नाकीनऊ आलेल्या सर्वसामान्यांना वीज बिलाचा भार डोइजड झाला असून बिल कसे भरायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कोरोनाकाळात ६ महिन्यांचे बीजबिल माफ करावे, या मागणीसाठी गतवर्षी आंदोलनाचे रान उठले. यंदाही अशीच स्थिती उद्भवल्याने सरकारने यंदा तरी बिलमाफीसाठी झुंजणाऱ्या वीज ग्राहकांना सवलतीचा डोस देऊन दिलासा देण्याची गरज आहे. सलग २ वर्षे लॉकडाउनमुळे व्यापार बंद आहे. त्यामुळे व्यवसायीक ग्राहकांचाही आता वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
औद्योगिक क्षेत्राचे तर कंबरडेच मोडले आहे. अशीच स्थिती घरगुती ग्राहकांची बनली आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैैसा नसल्याने घरगुती ग्राहकांनाही वीज बिल कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. गतवर्षी नागरिकांतील असंतोष कमी करण्यासाठी केवळ वीजतोडणी मोहीम स्थगित करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला. आता पुन्हा यंदाही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांनाही फटका बसला आहे. रिक्षा चालकांपासून फेरीवाल्यांपर्यंत, खासगी नोकरदारांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकास लॉकडाऊनची झळ बसली आहे. कोरोनाच्या धास्तीने सर्वसामान्यांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक स्थितीही बिघडली आहे.
अशावेळी सामान्यांना धीर देण्यासाठी राज्य सरकारने यंदातरी वीज बिलात सुट देऊन अथवा ६ महिन्यांचे बिल माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्याचा आर्थिक फटका मागील वर्षापासून सर्व सामान्यांवर बसत आहे. अशावेळी सर्व सामान्यांना वीज बिल कसे भरावे? असा प्रश्न पडत आहे.