अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहेत. जागा एक आणि दावेदार अनेक असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत बंडखोरीची शक्यता बळावली आहे. तर काही उमेदवारांना विविध पक्षांकडून उमेदवारी देण्यासाठी संदेश मिळाले आहे. अशात या उमेदवारांसमोर निवडणुकीत कोणता झेंडा घेऊ मी हाती अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पाच वर्ष ज्या पक्षाची उणी-दुणी काढली मात्र आता त्याच पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने त्यांचाच गुणगौरव करण्याची वेळ या उमेदवारांवर आली आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच मिनी मंत्रालयातून पुढील राजकारणाची दिशा ठरत असते. शिवाय जिल्हा परिषद निवडणूक लढविलेले अनेकजण पुढे आमदार, खासदार व मंत्री झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असते. कोरोनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक तब्बल दीड वर्ष उशिराने होत झाल्याने अनेकांना प्रतीक्षा करावी लागली होती.त्यातच आता निवडणूक जाहीर झाली असून, सध्या उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगरपंचायतच्या ५१ जांगासाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या तयार झाल्या आहेत. ६ डिसेंबर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने याच दिवशी सर्वच पक्षांचे उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून सर्वच पक्षांनी अंतिम टप्प्यात उमेदवारी यादी जाहीर करण्याचे नियोजन केले. पण उमेदवार सुध्दा तेवढेच चतुर असून, पक्षांकडून उमेदवारी मिळाली तर ठीक नाही तर ऐनवेळी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन अथवा अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीत अनेक उमदेवारांच्या हातात वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे दिसल्यास आश्चर्य वाटू नये.
प्रचारासाठी मिळणार सहा दिवस - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी ६ डिसेंबर, तर नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ७ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे, तर १३ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी करून चिन्हवाटप होणार आहे. त्यामुळे १४ तारखेपासून प्रचारात रंगत येणार आहे. २१ डिसेंबरला निवडणूक होत असल्याने त्यापूर्वी ४८ तास आधी जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांना सहा दिवस मिळणार आहेत.
बंडखोर वाढविणार पक्षाचा ताप - एकाच जागेसाठी पक्षातच आठ ते दहा इच्छुक उमेदवार आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी दोन-तीन वर्षे मेहनत घेतली आहे. मात्र यानंतरही पक्षांकडून तिकीट न मिळाल्यास अनेकांनी पक्षाविरुद्ध बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे बंडखोरीच्या चिंतेने सर्वच राजकीय पक्षाचा ताप वाढणार हे निश्चित असून, यावर ते काय तोडगा काढतात हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वरिष्ठ नेत्यांकडे गेल्या याद्या - सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या याद्या तयार केल्या. तसेच यापैकी कोणत्या उमेदवाराला पक्षाची उमेदवारी द्यायची आहे त्याच्या नावावर विशेष खूण करून पाठविली केली आहे. या याद्यांवर अंतिम हात फिरविण्यासाठी या याद्या आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे गेल्या आहेत. या याद्या रविवारी (दि.५) परत येणार असून सोमवारी त्या जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती आहे.