सडक अर्जुनी (गोंदिया) : तालुक्यातील ग्राम पंचायत वडेगाव येथील सरपंच, उपसरपंचसह दोन सदस्यांना 70 हजार रुपयाच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी कारवाई करीत ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तक्रारदार हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचयात वडेगाव येथे सन 2020– 21 मधे ग्रामपंचयात निविदेनुसार विविध कामाकरीता बांधकाम साहित्य पुरवठा केलेला होता. तक्रारदाराला पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याच्या मंजूर बिलाचे धनादेशकरीता गैर अर्जदार यांनी 15 लाख 55 हजार 696 रुपयाच्या रकमेवर पाच टक्के प्रमाणे 75 हजार रूपयाच्या रकमेची मागणी करुन तडजोडी अंति 70 हजार रुपये पंचासमक्ष मागणी करून लाच प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणाची पडताळणी 10 ऑगस्ट रोजी करण्यात आली.
आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्व:ताच्या लाभाकरीता गैरवाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. यात आरोपी सरपंच रिना हेमंत तरोने (वय 32), उपसरपंच दिनेश सुनील मुनीश्वर (वय 27), ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मंसाराम मेंढे (वय 38), ग्रामपंचायत सदस्य लोपा विजय गजभिये (वय 50 वर्ष) सर्व ग्राम पंचायत वडेगाव, तालुका सडक अर्जुनी येथील रहिवासी असून यातील 1, 2, 3, यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.