सालेकसा : अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी भाग म्हणून ओळख असणाऱ्या पिपरिया येथील लघु सिंचन प्रकल्पाची दुरवस्था झाली असून याचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देणाऱ्या एकमात्र अशा पिपरिया लघु सिंचन प्रकल्पाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. प्रकल्पातून पाणी मोठ्या प्रमाणात पाझरत असून, त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सिंचन प्रकल्प एक मुख्य कालवा व तीन उप कालवे आहेत. सद्यस्थितीत सदर संपूर्ण कालवे नादुरुस्त असल्याने कालव्यातून पाणी शेतापर्यंत जाणे अशक्य झाले आहे. तरी या कालव्याची दुरुस्ती आवश्यक आहे. अन्यथा हा प्रकल्प इतिहासजमा होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पाणी वापर सहकारी संस्थेवरच सर्व जबाबदारी
येथे कचारगढ पाणी वापर सहकारी संस्था गेल्या २००६ पासून अस्तित्वात आहे. या संस्थेद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यात येते. संबंधित विभाग फक्त प्रकल्पात साठवलेल्या पाण्याचा मोबदला घेतो. मात्र इकडे-तिकडे पाण्याच्या झालेल्या नासाडीचा भुर्दंड संस्थेलाच भरावा लागतो. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणीही होत आहे.
‘गोंदिया सिंचन विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या सिंचन प्रकल्पाची स्थानिक पाहणी आ. सहषराम कोरोटे यांनी एक वर्षापूर्वीच केली आहे. त्यांनी या प्रकल्पाचा कायापालट करण्याची सुध्दा हमी घेतली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची यासंबंधी बैठक सुध्दा त्यांनी घेतली आहे. परंतु, कार्यवाही शून्य आहे.
गुणाराम मेहर,सालेकसा.