लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. त्यानंतर विषय समिती सभापतीपदाची निवडणूक केव्हा होणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. बुधवारी (दि.११) जिल्हा निवडणूक विभागाने जि.प.विषय समिती सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २३ मे रोजी दुपारी ३ वाजता जि.प. सभागृहात निवडणूक होणार आहे. त्यामुळे विषय समिती सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. अडीच वर्षांकरिता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरिता मतदान घेण्यात आले. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी संघटन आणि दोन अपक्ष यांनी मिळून सत्ता स्थापन केली. अडीच वर्षांकरिता भाजपला अध्यक्ष, तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळाले. आता विषय समिती सभापतीपदाकडे लक्ष लागले आहे. यात दोन अपक्षांना प्रत्येकी एक, चाबी संघटनेला एक आणि भाजपला एक सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकी दरम्यान भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांना सोबत घेतले. त्यातच उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. त्यामुळे अपक्ष सदस्यांना सुद्धा एक एक सभापतीपद द्यावे लागणार आहे. तसा शब्द सुद्धा भाजपने सत्ता स्थापन करताना अपक्ष सदस्य आणि चाबीच्या सदस्यांना दिल्याची माहिती आहे. मात्र विषय समिती सभापतीपदी सदस्यांची वर्णी लावताना भाजपला सर्वच गोष्टींचा समतोल साधावा लागणार आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नेमका कसा समतोल साधून २३ मे रोजी ही निवडणूक पार पाडतात याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
आता कोणता फार्म्यूला - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस, चाबी, अपक्ष सदस्यांना सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. यामुळे भाजपचे संख्या बळ आता ४० वर पोहचले असून बहुमताने कोणता निर्णय घेण्यास याची मदत होणार आहे. तर विरोधात केवळ काँग्रेसचे १३ सदस्य असल्याने सभागृहात त्यांनी भूमिका काय राहते हे महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे विषय समिती सभापतीपदाची निवड करताना भाजप कोणता फार्म्यूला लावते हे महत्वपूर्ण ठरणार आहे.
बांधकाम,शिक्षण सभापतीपदाकडे लक्ष विषयी समिती सभापतीपदापैकी बांधकाम आणि शिक्षण सभापतीपद ही दोन महत्वपूर्ण पदे समजली जातात. ही पदे मिळावी यासाठी बरीच स्पर्धा असते. त्यामुळे भाजप यापैकी स्वत:कडे यापैकी कोणते सभापतीपद ठेवते आणि राष्ट्रवादी आणि अपक्ष सदस्यांना कोणते सभापतीपद देते हे महत्वपूर्ण ठरणार आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदी अपक्ष सदस्याची वर्णी लागणार आहे. तर शिक्षण आणि आरोग्य समितीचे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस मागू शकते. पशुसंवर्धन आणि समाजकल्याण सभापतीपद अपक्ष सदस्यांना दिले जाण्याची शक्यता आहे.