लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महामार्गावर वाहन चालविण्याची वेग मर्यादा ८० ते १२० दरम्यान असते. मात्र, वाहन कंपन्यांकडून वाहनांची वेग मर्यादा २५० पर्यंत दिलेली असते. मात्र, नियमानुसार दिलेल्या वेग मर्यादेनुसार वाहन चालविणे गरजेचे असताना वाहने १५० च्या वेगाने पळविली जातात.
त्यामुळे अपघातालाही आमंत्रण दिले जाते. महामार्गावरील वेग मर्यादा मर्यादित असताना वाहन कंपन्यांनीही वेग मर्यादा मर्यादित ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अपघात टाळण्यास मदत होऊ शकते.
वाहतुकीचे नियम तोडले की अपघात होतात व यामध्ये कित्येकांच्या जिवावर बेतते. 'लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा' हा वाहतुकीचा मंत्र असतानाही त्याचे पालन केले जात नाही. घरी जाण्याची भलतीच घाई त्यांच्या जीवावर बेतते. नियम तोडले की अपघात घडतात असे असतानाच दारू पिऊन वाहन चालविल्याने नियम तुटत असून अपघात घडत आहेत. बहुतांश अपघातांमध्ये चालक मद्यप्राशन केलेला आढळून येतो. मात्र, मद्य प्राशन करून वाहन भरधाव वेगात चालविले जाते. पुढे हाच प्रकार जिवावर बेततो. यामुळेच दारू पिऊन वाहन चालवू नये, असे सांगितले जाते.
हेल्मेट, सीट बेल्ट विसरू नका बहुतांश अपघातात डोक्याला मार लागूनच व्यक्तीचा जीव जातो. यासाठीच वाहन चालविताना दुचाकीचा- लकांनी हेल्मेट लावले पाहिजे. तसेच भरधाव वेगात वाहन चालवू नये.
जिल्ह्यात सर्वाधीक वेगमर्यादा ११० जिल्ह्यात सर्वाधीक वेग ११० आहे. जास्त वेगाची वाहने असली तरी त्यांनी जोरात वाहने चालवू नयेत. अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच गोंदियातील रस्ते खड्यात असल्याने वाहन जोराने चालविल्यास कधी अपघात होईल सांगता येत नाही.
वाहनांची वेग मर्यादा जास्त कशासाठी? वाहन तयार करणाऱ्या कंपन्यांनीच वाहनांना दिलेली वेग मर्यादा ही खूप अधिक असताना आता जास्त वेग मर्यादा देणे अत्यंत धोक्याचे आहे. अविचाराने जास्त वेगात वाहने चालविल्यास ते दुसऱ्यांचा जीव घेतील. रस्त्याने जाणाऱ्या निष्पाप व्यक्तीचा जीव घेणे हे खुनापेक्षाही गंभीर वाटते
वेगमर्यादा ओलांडली; महिन्यात लाखाचा दंड वसूल महामार्ग हे प्रवासास सुखकारक असले, तरी दिलेल्या वेग मर्यादित वाहन चालविणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा वाहनाचा वेग ठेवून चालक वाहने चालवित असतात. महामार्गावर वेग मोजण्यासाठी स्पीड गन ही लावण्यात आली आहे. महिन्याभरात साधारण लाख रुपयांचा दंड हा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहकांकडून वसूल केला आहे.
"वाहनांची स्पीड बांधून द्यावी म्हणजेच ते वाहन जास्त भरधाव वेगात चालविता येणार नाही. कमी वेगाची वाहने जर बाजारात आली तर जास्त वेगात वाहन चालविण्याचा प्रश्नच उरत नाही." - दिनेश चिंचाळकर, ऑटोमोबाईल तज्ज्ञ
"वाहन चालविताना प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम तुटले की, अपघात घडतात व कित्येकदा जिवावर बेतते. यामुळे नियम पाळा. कारण प्रत्येकाची वाट बघणारे घरी आहेत." - किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक गोंदिया शहर.