गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यासाठी २७४७ कर्मचारी आणि १४३१ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यासाठी या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली, पण ते मतदान प्रक्रियेदरम्यान ते अनेक मतदारांच्या संपर्कात आले. मात्र, मतदान प्रक्रियेचे कर्तव्य बजावून आल्यानंतर तर त्यांची कोरोना टेस्ट करणे आवश्यक होते. यासंदर्भात कुठलेच निर्देश नाही म्हणूनच या कर्मचाऱ्यांनी मतदानाच्या ड्युटीला जाताना कोरोना टेस्ट केली मग परत आल्यावर का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
ग्रामपंचायतच्या निवडणुका या कोरोनाच्या सावटाखाली पार पडल्या. त्यामुळेच मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान सर्वच मतदान केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४३३२ कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. मतदान केंद्रावरील ड्युटी दरम्यान हे कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आले. यानंतर ते कर्तव्य बजावून घरी परतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहे. कारण, परतल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट झाली नाही. शासनाचे धोरणसुध्दा चुकीचे असृून ड्युटीवर जाताना कोरोना टेस्ट मात्र परतल्यावर काहीच नाही, ही पध्दतसुध्दा चुकीचे असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
...........
ग्रामपंचायत निवडणुकीच्या ड्युटीवर जाण्यापूर्वीच आम्हाला कोरोना टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले. पण ड्युटीवरुन परत आल्यानंतर परत कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात कुठल्याच सूचना प्रशासनाने दिलेल्या नाही. ड्युटीच्या कालावधीत आपण अनेकाच्या संपर्कात आलो.
- शरद उपलपवार,
......
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करून त्याचा रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुुसार टेस्ट करुन रिपोर्ट सादर केला. मात्र, खऱ्या अर्थाने टेस्टची आता गरज असून कारण मतदान प्रक्रियेदरम्यान आमचा अनेकांशी संपर्क आला. त्यामुळे ड्युटीवरुन परतल्यानंतर कोरोनाची टेस्ट करण्याची गरज आहे.
- एस.यु.वंजारी,
.....
कोविडचा प्रादुर्भाव अद्यापही पूर्णपणे कमी झालेला नाही. त्यामुळे धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. मतदानासाठी ड्युटी लागल्याने यादरम्यान मी अनेकांच्या संपर्कात आलो. त्यानंतर घरी परतलो. मात्र, परल्यानंतर कुठलीच टेस्ट झाली नाही. वास्तविक पाहता मतदानाच्या डयुटीवर जाताना जशी टेस्ट झाली तशीच कोरोना टेस्ट परतल्यानंर होणे गरजेचे आहे.
- डी.टी.कावळे,
......
जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : १८९
निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचारी : ४३३२
कर्तव्यावर जाण्यापूर्वाी टेस्ट झालेले कर्मचारी : २२४२