गोंदिया : जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत ३ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती आहे. या शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याला उशिरा होत असल्याने गृहकर्ज घेणाऱ्या शिक्षकांना प्रत्येक महिन्याला व्याजाचा भुर्दंड बसत असतो. या वेतनासाठी शिक्षकांकडून नेहमीच ओरड होताना दिसते. गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करतात. परंतु, उद्याचे भविष्य घडविणाऱ्या गुरुजींना वेळेवर त्यांचे वेतन होत नाही. शिक्षक नोकरीला लागल्यावर कर्ज घेऊन घरबांधणीचे काम करतात. एका घरासाठी २० ते ३० लाख रुपये कर्ज घेतलेल्या शिक्षकाला महिन्याला वेळेवर वेतन झाले नाही, तर प्रत्येक महिन्याला व्याजाचा भुर्दंड त्यांच्यावर बसतो. त्या व्याजापायी शिक्षकांना अनेकदा मनस्ताप होतो. प्रत्येक महिन्याला २० ते २५ दिवस उशिरा शिक्षकांचे वेतन होत असते. वेतन झाल्यावरही आठ ते दहा दिवस चेक क्लीअर व्हायला लागतात. बहुदा प्रत्येक तालुक्यातील पगार बिल वेळेवर येत नसल्यामुळे पगारास उशीर हाेतो. वेतनाच्या अनुदानाची मूळ प्रत जिल्ह्याला येण्यासाठी उशीर झाला तर वेतन वेळेवर होते. कोरोनामुळे मूळ प्रतचीही अट शिथिल झाली आहे. तरीही वेतन उशिरा मिळत असते.
..............................
महिन्याच्या शेवटी होतो पगार
प्रत्येक महिन्याचे वेतन दुसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत होते. मार्च महिन्याचे वेतन १ एप्रिलला मिळणे अपेक्षित असताना ते एप्रिल महिन्याच्या २५ तारखेनंतर मिळते. त्यामुळे बहुतांश शिक्षकांनी गृहकर्ज घेऊनच घर बांधले, त्या कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड शिक्षकांवर बसत असतो. यामुळे एका जिल्ह्यातील कोट्यवधी रुपये व्याजाचा भुर्दंड शिक्षकांना विनाकारण बसत असतो.
...........
जिल्ह्यातील एकूण शाळा - १०६५
जिल्ह्यातील शिक्षक - ३८००
...................
दर महिन्याला वेतन उशिरा होत असल्यामुळे शिक्षकांनी घरासाठी घेतलेल्या कर्जावर अतिरिक्त व्याज चढते. प्रत्येक महिन्याला व्याजाचा भुर्दंड बसत असल्याने दर महिन्याला वेळेवर पगार देण्यात यावा.
- अनिरुद्ध मेश्राम, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
............................
महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ तारखेला सर्व शिक्षकांचे वेतन व्हायला पाहिजे. परंतु, आम्ही अनेकदा मागणी करूनही वेळेवर वेतन होत नसल्याने शिक्षक बांधवांना विविध कामांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे वेळेवर शक्य होत नसल्याने व्याजाचा अधिक भुर्दंड बसतो.
- डी. टी. कावळे, जिल्हाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
............................
अत्यंत अडचणीत असलेल्या शिक्षकांना त्यांच्या देय कर्जावरील व्याजाचा पगार उशिरा होत असल्यामुळे खूप आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पगाराच्या बाबतीत वारंवार होणारी अडचण शासकीय यंत्रणेद्वारे दूर करावी.
-एस. यू. वंजारी, सरचिटणीस- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
................................
वेतनाची प्रक्रिया केंद्रस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत होत असल्याने यात विविध घटकांमधून ते बिल जात असल्यामुळे पगाराला थोडा उशीर होतो. परंतु, प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन तारखेलाच वेतन व्हावे, असा आमचा मानस आहे. त्यासाठी जिल्हा परिषद जलद गतीने काम करते.
- प्रदीप डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गोंदिया.