बोंडगावदेवी : चार महिन्यांपूर्वी विवाहबध्द झालेल्या निमगाव येथील एका २६ वर्षीय युवकाने पत्नीच्या मानसिक त्रासापायी शेतामधील विहीरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) सकाळी ११ वाजता घडली. खुनिराम बाबुलाल हुकरे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव येथील खुनिराम बाबुराव हुकरे (२६) हा ३ वर्षापूर्वी दक्षिणपूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया कार्यालयात वाणिज्य विभागात एमटीएस म्हणून नोकरीवर होता. मागील १६ एप्रिल २०१६ रोजी लाखनी येथील किशोर गभने यांच्या विद्याविभुषित स्नेहा नामक मुलीशी त्याचे लग्न झाले होते. लग्नानंतर पत्नी तीन-चार दिवसच खुनिरामसोबत राहीली असे मृतकाच्या भावाने सांगितले. बीएससी फायनलचे पेपर असल्याने पत्नी परीक्षा द्यायला मे महिन्यात माहेर गेली. काही दिवसांनी आणायला या, असा निरोप जून महिन्यात पत्नीकडून आल्याने खुनिराम पत्नीच्या माहेरी एकटाच गेला. तिथे त्याच्यावर दबाव टाकून मारहाण करण्याची धमकी त्याला देण्यात आली. सासरकडून हुंड्यासाठी त्रास देत आहे, अशी तक्रार त्याचवेळी २६ जून रोजी लाखनी पोलीस स्टेशनला देण्यात आली. कौटुंबिक तक्रार असल्याने प्रकरण महिला आयोग भंडाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. पत्नीच्या तक्रारीवरून पती खुनिरामची २१ जुलै, ५ आॅगस्ट रोजी महिला आयोगासमोर पेशी झाली. अत्यंत निर्मल, सुशिल स्वभावाचा असलेला खुनिराम पत्नीच्या नाहक तक्रारीमुळे मनाने फार खचून गेला. शुक्रवारी (दि.५) पेशीवरून आला तेव्हापासून तो चिंताग्रस्त वाटत होता. शनिवारी (दि.६) सकाळी ८ वाजता शेतामध्ये जातो असे घरच्यांना सांगून तो सायकलने शेतामध्ये गेला. तो आला नाही म्हणून अखेर शेतामध्ये जावून पाहिले असता विहीरीजवळ मोबाईल व छत्री ठेवलेली दिसली. विहीरीत गळ टाकून पाहिले असता खुनिरामचा मृतदेह गळाला लागला. पत्नीच्या मानसीक त्रासापायी माझ्या भावाने आत्महत्या केली असे बयाण मृतकाचे भाऊ बाळू व कृष्णा या दोन भावडांनी पोलीसांजवळ नोंदविले. (वार्ताहर)
पत्नीच्या त्रासापायी पतीची आत्महत्या
By admin | Published: August 07, 2016 12:49 AM