सडक-अर्जुनी : यावर्षी तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर होत आहे. नदी-नाले, तलाव व लहान बोड्या कोरड्या पडल्याने मानवासह वन्यप्राण्यांचीसुद्धा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. जंगलातील पाणवठेसुद्धा कोरडे पडले असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वाढते तापमान व पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यूसुद्धा होत आहे. तालुक्यात शशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.
गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यावर्षी एप्रिल महिन्यात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी उन्हाळा चांगलाच पडल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगवासारख्या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
.......
२० वर्षांपासून तलावातील गाळाचा उपसा नाही
नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील थाडेझरी गावाजवळील तलाव पूर्णतः कोरडा पडला आहे. सन १९९८ पासून थाडेझरी येथील तलावाचे वन्यजीव विभागाने खोलीकरण केले नाही. थाडेझरीपासून नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प ७ किमी. अंतरावर आहे. थाडेझरी हे गाव पुनर्वसित गाव आहे. तलाव पूर्णतः कोरडा पडला पडल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टँकर लावून पाणवठ्यात पाण्याची सोय
नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसर्गिक स्त्रोतांचे तर १५४ कृत्रिम पाणवठे असून २४ तलावही या क्षेत्रात आहेत. १५४ कृत्रिम पाणवठ्यात पाणीपुरवठा व्हावा यासाठी १४९ हातपंप तयार केले आहेत. त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत. १३ पाणवठ्यात ३ टँकरव्दारे पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर वन्यप्रेमींनी जंगलातील कुठल्याच पाणवठ्यात पाण्याची सोय करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. काही निसर्गप्रेमी संस्थांनी आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती दिली.