इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यात यावर्षीसुद्धा इटियाडोह धरणाच्या सिंचनाने रबी हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केली आहे. जानेवारी महिन्यात रोवणी केलेल्या धान पिकाचे उत्पादन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निघण्याला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने व धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिणामी, अल्पदाराने खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सध्या धान खरेदी केंद्रबाबत मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर, अशी अवस्था आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी जिल्ह्यातील राइस मिल मालकांनी धानाची उचल करणे व भरडाई करून तांदूळ शासन जमा करण्याबाबतच्या सध्याच्या स्थितीबाबत व शासन धोरणाबाबत चर्चा केली. यावेळी मिलमालक व व्यापारी उपस्थित यावेळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मिल मालकांच्या मागण्या व त्यासंदर्भात शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान धानाची उचल व भरडाई ३१ मेअखेरपर्यंत होऊन रबी हंगामातील धान खरेदीसाठी गोदाम उपलब्ध होईल, असे आश्वासनसुद्धा देण्यात आले. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी धानाची विक्री करायची नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
............
शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या दारात
रबी हंगामातील धान बाजारपेठेत विक्री येण्यास सुरुवात झाली तर अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला २५६८ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना अल्प दाराने धान विकण्याची वेळ आली आहे.
............
शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका
शासनाने मागील चार महिन्यांपासून धान भरडाईवर राइस मिलर्सशी चर्चा करून तोडगा काढला नाही. परिणामी, रबी हंगामातील खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे, या प्रश्नावरून खरेदी करण्यास विलंब केला जात आहे. शासनाने यावर वेळीच तोडगा काढला असता तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती, असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.