पोलिसांकडून लपवाछपवी : आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून कळणार मास्टरमाईंडगोंदिया :राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी न.प.उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींंना गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूरच्या तेलनखेडी परिसरातून रविवारच्या रात्री अटक केली. या अटक झालेल्या आरोपींकडून अधिकाअधिक माहिती वदवून घेण्यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करीत आहे. परंतु याबाबत तेवढीच गुप्तताही पाळली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात काही मोठ्या व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पंकज यादववर हल्ला केल्यानंतर आरोपी नागपूरला फरार झाले. परंतु पंकज यादववर यापूर्वी नगर परिषदेच्या आवारात हल्ला करणारे आरोपी तुरूंगात असताना त्यांनी इतर कैद्यांशी मित्रता केली असावी व त्यातून हे प्रकरण अस्तित्वात आले असावे, या दिशेने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यात राजा महेश सांडेकर (२१) याची नागपूर येथे वास्तव्यास असलेल्या एका कैद्यासोबत चांगलीच मित्रता झाली. त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतला. त्यानंतर त्याच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार राजा त्याच्याकडे येणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. इतर आरोपींचा माग काढण्यासाठीही पोलीस प्रयत्नशील आहे. मात्र यातील मास्टरमाईंडचा शोध घेणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)ती पिस्तूल आणली कुठून?पंकज यादववर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली पिस्तूल आरोपींनी कुठून आणली? गोळ्या कुठून आणल्या, या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली नाही. माध्यमांना परस्पर बातम्या पुरवू नका, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती घेण्याचा सल्ला पत्रकारांना दिला जात आहे. मात्र पोलीस नियंत्रण कक्षाकडे घटनेच्या तपासाची माहितीच राहात नसल्याने आम्ही कुठली माहिती देणार? असा प्रश्न त्यांच्याकडून येतो. ती पिस्तूल आली कुठून याचा शोध पोलिस अद्यापही घेऊ शकले नाही. आरोपींच्या घराची घेतली झडतीया प्रकरणाचा तपास गोंदिया शहर पोलिसांकडे असल्याने या आरोपींच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. या झडतीत काय सापडले यासंदर्भात पोलिस विभाग गुप्तता पाळत आहे. घरझडतीतून मिळालेले साहित्य पुढच्या तपासासाठी मदत करणार आहे.
बड्यांची नावे पुढे येणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 1:54 AM