गोंदिया : कृषी कायद्याविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण होत असल्यानिमित्त शनिवारी (दि.६) जिल्ह्यातील अनेक शेतकरी व सामाजिक संघटना शेतकऱ्यांचा समर्थनार्थ एकत्र येणार आहेत. तसेच घरावर काळे झेंडे व काळी फित लावून सरकारी नीतिमत्ताचा विरोध केला जाणार आहे.
जिल्हा संयुक्त किसान मोर्चा व संविधान मैत्री संघ यांच्या आवाहनावर सरकार विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी ओबीसी सेवा संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मुस्लिम जमात समिती, राष्ट्रीय आदिवासी पीपल्स फेडरेशन, समता सैनिक दल, सामाजिक एकता मंच, राणी अवंतीबाई लोधी महासभा, युवा बहुजन मंच, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, जिल्हा सांस्कृतिक मंडळ, बुद्ध विहार समित्या आणि इतर शेतकरी, सामाजिक पक्ष संघटना संयुक्तपणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करतील. या निवेदनातून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत अनावश्यक वाढीस विरोध केला जाईल. जिल्ह्यातील संयुक्त किसान मोर्चा व सामाजिक संघटनांनी जिल्ह्यातील जनतेला घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध दर्शवून सरकारच्या हुकूमशाही वृत्तीला कडाडून विरोध करण्याचे आवाहन केले आहे.