बोंडगावदेवी : राज्यात सत्ता बदल झाला व राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष वाढला. राज्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. वारंवार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा सहानुभूती करुन मदत द्या. यासाठी मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंतची सानुग्रह मदत जाहीर केली. ती मदत शेतकऱ्यांपर्यंत अजूनपावेतो पोहचलीच नाही. शेतकऱ्यांना गाजर न दाखविता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह मदत देण्यासाठी पुनर्विचार करावा अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी केली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सानुग्रह मदत वाटप करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याचवेळी राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. अर्थव्यवस्था डबघाईला आली म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च २०२१ पर्यंत मदत केली जाईल अशी माहिती लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत होती. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून २०२१ च्या अर्थसंकल्पात नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसंबंधी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याने गाजर दाखविण्यात आल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. सत्तेत आल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह मदत करण्यासाठी राज्यशासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी लांजेवार यांनी केली आहे.