लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मुरकुटडोह-दंडारीच्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वरुन अन्नपुरवठा विभागाने मुरकुटडोह येथील स्वस्त धान्य दुकान रद्द करुन हे धान्य दुकानाला दंडारी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडले. परंतु मूळ समस्या अजूनही कायम असून त्या वंचित गरजू लोकांना हक्काचे धान्य मिळेल काय. तसेच ज्यांचे रेशन कार्ड अद्याप बनले नाही त्यांचे कार्ड बनवून नियमित धान्य केव्हापासून दिले जाईल असे काही मूळ प्रश्न अजूनही कायम आहेत. कारण तहसील कार्यालयातील जबाबदार व्यक्ती या समस्यांना गांभीर्याने घेतांना दिसून येत नाही.नेहमी उपेक्षित असलेल्या मुरकुटडोह येथील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम ‘लोकमत’ ने केले. त्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले. अधिकारी या गावांकडे जाण्याच्या नावानेच घाबरत होते किंवा कोणते ना कोणते कारण दाखवून या गावाकडे जाण्याचे टाळत होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या गावांना भेट दिल्यानंतर आता इतर अधिकारी कर्मचारी सुद्धा येथे पोहचले खरे, परंतु तेथील समस्यांचे निवारण लवकरात लवकर करण्यासाठी तालुक्यातील जबाबदार लोक गंभीरतेने पाऊल उचलताना दिसून येत नाही.मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अन्न योजनेचे किंवा इतर कुणालाही गहू, तांदूळ मिळत नाही.अशात आता या धान्य दुकान दंडारी येथील स्वस्त धान्य दुकानाला जोडले आहे. मात्र ज्यांची नावे नोंद आहेत, त्यांच्या पुरताच धान्य पुरवठा या दुकानाला होणार अशात या दुकानातून वंचित लोकांना धान्य देण्याचा विचार होणार का? असा प्रश्न पडतो. तसेच गरीब कल्याण योजनेचे गहू, तांदूळ सुद्धा आॅनलाईन झालेल्या लोकांसाठी पुरवठा करण्यात येईल. मग वंचित लोकांना धान्य कुठून व कसे मिळणार हा प्रश्न कायम आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी.अनेक गावात या समस्या कायमनागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून नियमित व पुरेसे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी या तालुक्यात सामान्य बाब आहे. मुरकुटडोह वगळता तालुक्यातील अनेक गावात स्वस्त धान्य दुकानदार इमानदारीने पूर्ण धान्य वाटप करीत नाही. या मागचे कारण शोधले असता काही बाबीसमोर आल्या, त्या म्हणजे तहसील कार्यालयात बसलेले संबंधीत काही कर्मचारी दर महिन्याला दुकानदाराकडून अवैध वसूली करीत असल्याचा आरोप आहे. तपासणीसाठी गेले की दुकानदाराकडून फुकटात साखर व गहू जात असल्याचा आरोप आहे.महिला बचत गट नावापुरतेचकाही गावांमध्ये महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान देण्यात आल्याचे बोलले जाते. परंतु ते बचत गट नावापुरतेच असून भलताच व्यक्ती रेशन दुकान चालवितो. मुरकुटडोहचे रद्द झालेले रेशन दुकान विदर्भ महिला व बचतगट दंडारी यांना देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात हे रेशन दुकान तेथील अंगणवाडी सेविका चालवित असल्याची माहिती आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आहे.लोकांना तहसील कार्यालयात बोलाविलेतहसील कार्यालयाच्यावतीने मुरकुटडोह येथे नुकतेच शिबिर घेऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु जेव्हा काही महिलांनी नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी आग्रह केला तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सालेकसा येथे बोलाविले. तालुका मुख्यालयापासून मुरकुटडोहचे अंतर सुमारे ३५ किमी असून नागरिकांनी पायीच जावे लागते. मग ते ३५ किमी.चा प्रवास करीत सालेकसा कसे पोहचतील. अशात तहसीलदारांसह सबंधीत अधिकारी व कर्मचाºयांनी आपल्या कर्तव्याचे पालन करीत या लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक आहे.
त्या वंचितांना नियमित धान्य मिळेल काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 5:00 AM
मुरकुटडोह येथील जवळपास ७०-८० लोकांना आजपर्यंत गरीब कल्याण योजनेचे तांदूळ,गहू मिळालेच नाही. कारण की त्यांची नावे ऑनलाईन झालीच नाही. त्याचप्रमाणे ७ कुटूंब असे आहेत की त्यांचे अद्याप रेशन कार्ड बनलेच नाही. त्यामुळे त्यांना गरीब कल्याण योजनेसह अंत्योदय अन्न योजनेचे किंवा इतर कुणालाही गहू, तांदूळ मिळत नाही.
ठळक मुद्देदुकान रद्द झाले तरी समस्या कायम : दंडारी येथील बचतगट नावापुरतेच