शासनाला विसर : मोहीम राबविणारे नाराज गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत व्यापक लोकसहभाग अपेक्षित आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य केल्यास त्यांचा सत्कार करण्याचे शासनाने ठरविले होते. परंतु या मोहिमेला नऊ वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने मोहीम राबविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान केला नाही.तंटामुक्त गाव मोहीम प्रभावीपणे राबविण्यासठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, तालुका स्तरावरील समिती व पोलीस ठाणे स्तरावरील समिती तयार केली. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तंटामुक्त गाव समितीस येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करून त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित केले. यासाठी शासन मोहीम राबविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करणार होते. या मोहिमेसाठी मोहीम अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. परंतु शासनाने त्यांचा सत्कार केला नाही.विभागीय आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (परिक्षेत्र) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोहिमेच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सुचविले होते. मोहिमेतील कामकाज हे वेगळ्या स्वरूपाचे असल्याने विकास प्रशासकीय व पोलीस यंत्रणेस व्यापक लोकसंवाद साधून समर्पितपणे काम करावे लागले. त्या दृष्टीने मोहिमेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विकास प्रशासकीय व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार, असे शासन निर्णयात नमूद केले. महसूल विभागातील राज्यातील सहा महसूल विभागांपैकी ज्या महसूल विभागात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजे त्या विभागातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेच सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी सर्व विभागांपेक्षा अधिक असेल, अशा विभागाच्या विभागीय आयुक्तांना त्यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. पोलीस परिक्षेत्रातील राज्यातील सात पोलीस परिक्षेत्रांपैकी ज्या पोलीस परिक्षेत्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या परिक्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी सर्व परिक्षेत्रांपेक्षा अधिक असेल, अशा पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून त्या महसूल विभागात असलेल्या जिल्ह्यांपैकी ज्या जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या विभागातील इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक असेल, अशा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ज्या तालुक्यांमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा अधिक असेल, अशा तालुक्याचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या पोलीस ठाणे परिक्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या जिल्ह्यातील इतर पोलिस ठाणे परिक्षेत्रांपेक्षा अधिक असेल, अशा पोलीस ठाण्यांचे प्रमुख यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. गावपातळीवर जिल्ह्यातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तंटामुक्त गावातील बीट हवालदार, गाव कामगार तलाठी व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल, असे ठरले होते. मात्र शासन निर्णयाप्रमाणे सदर मोहीम राबविण्यात येत नसल्याची ओरड सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
By admin | Published: September 22, 2016 12:40 AM