गोंदिया : प्रादेशिक वनविभाग परतवाडाअंतर्गत येणाऱ्या धारणी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या लांडग्यांनी चांगलीच दहशत पसरविली आहे. रविवारी धारणी शहरासह तालुक्यातील इतरही गावातील आठ नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. जखमींवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर वनविभागाने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
प्राप्त माहितीनुसार, प्रादेशिक वनविभाग परतवाडाअंतर्गत येणाऱ्या धारणी वनपरिक्षेत्राची सीमा ग्रामीण भागासह शहराशी खेटली आहे. सद्य:स्थितीत जंगलातील वन्यप्राण्यांनी गावकडे धाव घेणे सुरू केले आहे. गावालगत व नदी-नाल्यालगत असलेल्या शेतात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. पंधरवड्यापूर्वी एका कोल्ह्याने २० नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते. त्यापैकी एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्या कोल्ह्याला नागरिकांनी ठार केले. मात्र, तालुक्यात आता लांडग्यांची दहशत सुरू झाली आहे.
रविवारी शौचास जाणाऱ्या व शेतात काम करणाऱ्या आठ नागरिकांना चावा घेऊन या प्राण्याने जखमी केले. त्यामध्ये धारणी शहरातील वॉर्ड ५ येथील अयानउल्ला या आठ वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. तो सकाळी शहरालगत असलेल्या मधवा नाल्याशेजारी शौचास गेला होता. तेथे लांडग्याने त्याच्यावर झडप घातली. सोबतीला असलेल्या मित्राने आरडाओरड करून त्याचा जीव वाचवला व कुटुबीयांना माहिती दिली. अयानउल्ला याच्या ओठावर खोलवर जखम आहे.
आवेज खान मोबीन खान (३२, रा. धारणी), सचिन सुरेश भिलावेकर (१७), बापूराव जावरकर (२९), सानू ओंकार कासदेकर (६५, रा. मांडवा), अभिजित श्यामलाल भिलावेकर (रा. टेंबली), पिंगलाबाई रामकिसन भारवे (६४), प्रेमलाल काल्या मोरेकर (२५, रा. राणितंबोली) या आठ जणांना चावा घेऊन लांडग्याने जखमी केले. धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातारकर व त्यांच्या चमूने त्यांना वैद्यकीय सुविधा पुरविली.
लांडगा की कोल्हा?
पंधरवड्यापूर्वी कोल्ह्याने २० नागरिकांना जखमी केले होते. रविवारी सकाळी शहरालगत कोल्ह्याने चावा घेतल्याचे, तर ग्रामीण भागात लांडगा (टेमळ्या) असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे वनविभाग या वन्यप्राण्यांचा शोध युद्धस्तरावर घेत आहे. मांडवा येथील सानू ओंकार कासदेकर यांनी तो लांडगा (टेमळ्या) सारखाच वेगळा वन्यप्राणी असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.
वन्यप्राण्याचा शोध धारणी वनपरिक्षेत्र सुसर्दा वनपरिक्षेत्र व मोबाइल स्कॉड, धारणी यांच्याकडून सुरू आहे. अमरावतीसह सिपना वन्यजीव विभागातील बचाव पथक बोलाविण्यात आले आहे.
- पुष्पा सातारकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, धारणी