माता-बाळ सुखरूप : महिलेची नॉर्मल डिलिव्हरीगोंदिया : ‘उपरवाला जब भी देता, देता छप्पर फाडके’ या म्हणीची व गाण्याची आठवण करून देणारी घटना गंगाबाई रुग्णालयात घडली. छोटा गोंदिया निवासी एका महिलेने नववर्षांच्या पहिल्याच दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल चार बाळांना जन्म दिला. विशेष म्हणजे येथील बाई गंगाबाई सरकारी महिला रूग्णालयात या महिलेची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली असून माता व बाळ सुखरूप आहेत. वंशाला दिवा मिळावा म्हणून दाम्पत्यांची धडपड सुरू असते. त्यातही कित्येकांना बाळ होत नसल्याने ते उपचारासोबतच मंदिरांत माथा टेकण्यापासून नवस पर्यंत सर्व काही करतात. यात काहींना फळ येते, तर काहींना तसेच मन मारून रहावे लागत असल्याचेही प्रकार बघावयास मिळतात. तर काहींना अपेक्षापेक्षा जास्त देव देऊन टाकतो. असलाच काहीसा प्रकार शहरातील छोटा गोंदिया निवासी महिलेसोबत घडला. देवाने तिला नववर्षाची भेट म्हणून एक, दोन नव्हे तर तब्बल चार बाळांची बम्पर भेट दिली. येथील छोटा गोंदिया निवासी भूमेश्वरी संदीप मंडल (२३) यांच्या प्रसुतीची वेळ आल्याने त्या खाजगी डॉक्टरकडे गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या पोटात तीन बाळ असल्याने व त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना बाई गंगाबाई रूग्णालयात रेफर केले. त्यानुसार, गुरूवारी (दि.३१) सायंकाळी ७.३० वाजता त्यांना बाई गंगाबाई रूग्णालयात भरती करण्यात आले. शुक्रवारी (दि.१) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूमेश्वरी यांची डॉ.सायस केंद्रे व परिचारीका श्रृष्टी मुरकूटे यांनी नॉर्मल डिलिव्हरी करून चार बाळांना जग दाखविले. (शहर प्रतिनिधी)बाळांत तीन मुले व एक मुलगी भूमेश्वरी यांनी जन्म दिलेल्या चार बाळांमध्ये तीन मुले व एक मुलगी आहे. यातील तीन बाळ प्रत्येकी एक किलो वजनाचे असून एक बाळ एक किलो २५० ग्राम वजनाचे आहे. या चौघांना सध्या रूग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात (एनआयसीयू) ठेवण्यात आले आहे. भूमेश्वरी व बाळ धोक्याबाहेर आहेत.
महिलेने दिला एकाच वेळी चार बाळांना जन्म!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2016 2:15 AM