देवरी (गोंदिया) : नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती महिलेने धावत्या ट्रॅव्हल्समध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना देवरी येथे गुरुवारी (दि. १४) सकाळी आठ वाजता घडली. प्रियंका मंगू बंजारे (वय २३) असे या महिलेचे नाव आहे. आई व बाळ दोघेही सुखरूप असून त्यांना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार पुणे-बिलासपूर ट्रॅव्हल्स (सीजे ०८, एडब्ल्यू ०११३) ने प्रियंका बंजारे, तिचे पती आणि आत्या बुधवारी सायंकाळी बिलासपूरला आपल्या गावाकडे जाण्याकरिता पुण्यावरून बसले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता ही एका ट्रॅव्हल्स कोहमारा ते देवरीदरम्यान पोहोचताच प्रियंकाला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. तिच्या पतीने ट्रॅव्हल्सचालकास सूचना दिल्यावर चालकाने तातडीने देवरी रुग्णालयात ट्रॅव्हल्स नेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रुग्णालयाजवळ ट्रॅव्हल्स पोहोचताच महिलेने ट्रॅव्हल्समध्येच गोंडस बाळाला जन्म दिला.
महिलेची आत्या व ट्रॅव्हल्समधील महिला प्रवाशांनी यावेळी धावत येऊन महिलेला मदत केली. नंतर ट्रॅव्हल्समध्येच देवरी ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका मदतीसाठी धावून आल्या. महिला व बाळ दोघेही सुखरूप आहेत. दोघांना देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्सचालक देवलाल शाहू व प्रवाशांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
डॉक्टरांनी दिली होती प्रसूतीची २१ तारीख
प्रसूती झालेल्या महिलेने सांगितले की, आम्ही बिलासपूरजवळ मुंगेली जिल्ह्यातील साकेत येथे राहतो. रोजंदारीच्या कामासाठी पुण्याला बऱ्याच दिवसांपासून राहत होतो. माझे पती हे इमारत बांधकामाचे काम करतात. प्रवासाला निघण्यापूर्वी पुण्याला डॉक्टरांकडे मी तपासणी केली असता त्यांनी प्रसूतीची तारीख २१ सप्टेंबर असल्याचे सांगितले. म्हणून आम्ही आपल्या गावाकडे जात होतो. प्रवासादरम्यानच गुरुवारी बाळाला जन्म दिला. आम्ही दोघेही सुखरूप आहाेत. बसचालक व प्रवाशांनी मदत केली त्यासाठी मी त्यांची आभारी असल्याचे प्रियंका बंजारे यांनी सांगितले.
चालक व प्रवाशांनी घडविले माणसुकीचे दर्शन
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये गर्भवती महिलेची प्रसूती झाली. यावेळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी आणि चालकाने माणुसकीचे दर्शन घडविले. ट्रॅव्हल्समधील महिला प्रवाशांनीही मदत केली.
बंजारे कुटुंबीय आनंदी
प्रियंका मंगू बंजारे यांना दोन अपत्ये होती; पण त्यांपैकी एक बाळ जन्मत:च दगावले, तर एक बाळ जन्मानंतर दोन महिन्यांनी दगावले होते. त्यामुळे बंजारे कुटुंबीय दु:खात होते. पण त्यानंतर त्या पुन्हा गर्भवती राहिल्या. बुधवारी त्यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी डाॅक्टरांकडे जाऊन तपासणी केली. डॉक्टरांनी प्रसूतीची २१ सप्टेंबर ही तारीख दिली. त्यामुळेच त्यांनी ट्रॅव्हल्सने गावाकडे येण्याचा निर्णय घेतला; पण गुरुवारी सकाळी ट्रॅव्हल्समध्येच प्रियंका बंजारे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. सुखरूप प्रसूती झाल्याने बंजारे कुटुंबीय आनंदित झाले.