गोंदिया : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. डव्वा येथे एका ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाली. तर, सालेकसा तालुक्यात निष्काळजीपणाने दुचाकी चालविणे एका तरुणाच्या जीवावर बेतले.
यशोदा भरत भोयर (५२) असे ट्रॅव्हल्सखाली चिरडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, अमित कुवरलाल उईके (३६, रा. पांढरी, ता. सालेकसा) असे दुचाकी अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यशोदा या २४ मार्च रोजी रोजी सायंकाळी लग्नानिमित्ताने नातेवाइकांचे घरी कोलारगांव (कोसबी) येथे गेल्या होत्या. त्यानंतर, त्या मुलाचा गावी बोळंदा (गोरेगाव) येथे गेल्या. तेथील कार्यक्रम आटोपून २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता जिपने डव्वा येथे उतरल्या. त्या रस्ता ओलांडत असताना, कोहमाराकडून गोंदियाकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रॅव्हलने त्यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचाराच्या दरम्यान २६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिवलाल घावडे करीत आहेत.
तर दुसरीकडे, सालेकसा तालुक्याच्या पांढरी ते सोनपुरी मार्गावर २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अमित कुवरलाल उईके (३६, रा. पांढरी, ता. सालेकसा) हा आपल्या दुचाकीने (एम. एच. ३५ ए. एस. ५१६९) जात होता. दरम्यान, दुचाकी निष्काळजीपणे चालविल्याने पांढरी ते सोनपुरी मार्गावर त्याचा अपघात झाला. यात तो जागीच ठार झाला. चंपा अशोक लिल्हारे (३३, रा. पांढरी, ता. सालेकसा) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नायक कुवरलाल मानकर करीत आहेत.